शेतकरी ठिय्या आंदोलनाला काँग्रेसचा भक्कम पाठिंबा; जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांची उपस्थिती
गडचिरोली, दि. ४ : प्रस्तावित जमीन अधिग्रहणाविरोधात गडचिरोली येथे सुरू असलेल्या शेतकरी ठिय्या आंदोलनाला गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने जाहीर पाठिंबा दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांच्या लढ्याला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी बोलताना ॲड. कोवासे म्हणाले की, राज्यातील महायुती सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असून सत्तेचा गैरवापर करून शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांची सुपीक जमीन बळजबरीने अधिग्रहित केली जात असून हा प्रकार अत्यंत अन्यायकारक आहे. अशा निर्णयांविरोधात काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला असून भविष्यातही राहील, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या या संघर्षाला अधिक बळ मिळावे यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे आणि शेतकऱ्यांच्या लढ्याला ताकद द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील तसेच गडचिरोली तालुक्यातील हिरापूर परिसरातील हजारो शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांच्या जमिनी, उपजीविका आणि हक्कांच्या संरक्षणासाठी सुरू असलेला हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. आंदोलनस्थळी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि एकजूट पाहायला मिळाली.











