Home Gadchiroli शेतकरी ठिय्या आंदोलनाला काँग्रेसचा भक्कम पाठिंबा; जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांची उपस्थिती

शेतकरी ठिय्या आंदोलनाला काँग्रेसचा भक्कम पाठिंबा; जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांची उपस्थिती

63

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, दि. ५ : प्रस्तावित जमीन अधिग्रहणाविरोधात गडचिरोली येथे सुरू असलेल्या शेतकरी ठिय्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने भक्कम पाठिंबा दर्शविला आहे. गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधला आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ॲड. कोवासे यांनी राज्यातील महायुती सरकारच्या धोरणांवर टीका केली. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळजबरीने अधिग्रहित करण्याचा प्रयत्न सुरू असून, सत्तेचा गैरवापर करून शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

“काँग्रेस पक्ष हा नेहमीच शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी लढत आला आहे. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय काँग्रेस कदापि सहन करणार नाही. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या या लढ्यात काँग्रेस पक्ष खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील,” असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या संघर्षाला अधिक बळ देण्यासाठी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसर तसेच गडचिरोली तालुक्यातील हिरापूर परिसरातील हजारो शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

जमिनी, हक्क आणि उपजीविकेच्या संरक्षणासाठी सुरू असलेला हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. शासनाने मागण्या मान्य करेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली. आंदोलनस्थळी शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आपल्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.