राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे एक दिवसीय शिबिर सोमवार ४ मार्च रोजी आहे.

339

भविष्याचा वेध घेण्यासाठी युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन

गडचिरोली, दि. ३ : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने भविष्यातील युवकांसमोरील आव्हाने लक्षात घेऊन व आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत युवकांचे योगदान वाढावे, याकरिता “युवा संवाद – वेध भविष्याचा” या विषयावर एक दिवसीय शिबिराचे आयोजन सोमवार, ४ मार्च २०२४ ला सकाळी १०:३० ते ५:०० वाजेपर्यंत गडचिरोली येथील सुमानंद सुभागृह आरमोरी रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर शिबीर दोन सत्रात चालणार असून पहिल्या सत्रात शिबिराचे उद्घाटन तर दुसऱ्या सत्रात शिबिराचा समारोप करण्यात येणार आहे.

पहिल्या सत्रात शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम (हलगेकर ) व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष निखील ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. ऋषिकांत पापडकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे निरीक्षक डॉ. अहेफाज देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ट नेते युनुस शेख उपस्थित राहणार आहेत.

*दुसऱ्या सत्रातील समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम राहणार आहेत. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते पार्थ पवार, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती नाना नाकाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते श्रीनिवास गोडसेलवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.*

या कार्यक्रमादरम्यान, युवक व राजकारण, राजकारणामध्ये युवकांची भूमिका, व्यक्तिमत्व विकास व राजकारणात युवकांचा सहभाग, देशाच्या प्रगतीसाठी युवकांचा राजकारणामध्ये सहभाग आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध वक्ता, लेखक अमोल पुसदकर यांचे राजकारणामध्ये युवकांची भूमिका व छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. यासोबतच सिने अभिनेत्री निशिगंधा वाढ यांचेही मार्गदर्शन होणार आहे. त्यामुळे युवकांनी या “युवा संवाद – वेध भविष्याचा” शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांनी केले आहे.