माओवाद मोजतोय अखरेच्या घटका, ११ वरिष्ठ माओवाद्यांचे आत्मसमर्पण

35

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २० : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या डेडलाइनला अनुसरून माओवादी संपुष्टात आणण्यात सुरक्षा यंत्रणा यशस्वी ठरत असून गुरुवार (ता. १९) १ डिव्हीसीएम, १ एरीया कमिटी सचिव, १ पीपीसीएम, १ कमांडर, १ एसीएम पदावरील वरिष्ठ माओवाद्यांसह इतर ६ अशाी एकूण ११ माओवाद्यांनी पोलिस व सीआरपीएफपुढे आत्मसमर्पण केले आहे. शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे एकूण ६८ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते.

विशेष म्हणजे पोलिस व सीआरपीएफच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सन २०२५ पासून आतापर्यंत एकूण १२३ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. जिल्ह्यातील माओवाद आता जवळजवळ संपुष्टात आला असून, कधीकाळी गडचिरोली जिल्ह्यातील १० उपविभागात सक्रिय असणारी माओवादी चळवळ आता फक्त भामरागड उपविअभागाच्या सीमावर्ती भागातच कैद झालेली आहे. यासोबतच शासनाने सन २००५ पासून जाहीर केलेल्या शरणागती योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांचे पोलिस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकूण ७९४ माओवाद्यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.गुरुवारी सोनी ऊर्फ बाली वत्ते मट्टामी (डिव्हीसीएम- कुतुल दलम) (वय ४५ , रा. बालेवाडा, ता. कोहकामेटा, जि. नारायणपूर, छत्तीसगड), बुदरी ऊर्फ रामबत्ती आयतू मट्टामी (एरीया कमिटी सचिव – इंद्रावती एरीया कमिटी) ( वय ४०, रा. बोडगा, ता. व जि. बीजापूर, छत्तीसगड), सुखलाल बोळगा कोक्सा (कमांडर – पश्चिम ब्युरो सप्लाय टीम) ( वय ३१ , रा. काकुर, ता. कोहकामेट्टा, जि. नारायणपूर छत्तीसगड), शांती ऊर्फ सोमरी गंगा तेलामी (पीपीसीएम – पश्चिम ब्युरो सप्लाय टीम) ( वय २८ ), रा. नागाराम, ता. कोंटा, जि. सुकमा, छत्तीसगड), यमुनक्का ऊर्फ रुखमाक्का पोट्टी पेंदाम (एसीएम – भामरागड दलम) ( वय ६० ), रा. गुड्डीगुडम (पोस्टे राजाराम खां), ता. अहेरी, जि. गडचिरोली, गणेश उलगे कोवासी (सदस्य – कंपनी क्र. १०), वय २१ , रा. हिक्केर (पोस्टे गर्देवाडा), ता. एटापल्ली, जि. गडचिरोली, मिनको ऊर्फ जमनी का­या मट्टामी (सदस्य – कंपनी क्र. १०), वय २२, रा. मुस्पर्शी (पोस्टे बांधे), ता. पखांजूर, जि. कांकेर (छत्तीसगड), धनु दसरु वेळंजे (सदस्य – कंपनी क्र. १०), वय ३८, रा. ताडगाव, ता. भामरागड, जि. गडचिरोली, सुनिता ऊर्फ वंगे वत्ते होयाम (सदस्य – सँड्रा दलम), वय २५, रा. वेलगंड्रा (पोस्टे परसेगड), ता. व जि. बीजापूर (छत्तीसगड), रमेश पांडू मडावी (सदस्य – मोबाईल पोलीटीकल स्कुल), वय २८, रा. गोगागुडा, ता. व जि. सुकमा (छत्तीसगड), किशोर सुक्रैय्या वासम (मिलिशीया कमांडर – सँड्रा दलम), वय ३३, रा. सँड्रा (पोस्टे परसेगड), ता. भोपालपट्टनम्, जि. बिजापूर (छत्तीसगड) यांनी गडचिरोली पोलिस दल व सीआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले आहे.विशेष म्हणजे १५ ऑक्टोबर २०२५ रोजी पाॅलिट ब्युरो सदस्य, केंद्रीय समिती सदस्य, प्रवक्ता-सीपीआइ माओवादी तसेच सचिव-केंद्रीय रिजनल ब्युरो मल्लोजुला वेणूगोपाल राव ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू याच्यासह एकूण ६१ माओवाद्यांनी ५४ शस्त्रांसह मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोली आणि संपूर्ण दंडकारण्य विभागातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला होता. गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर असून भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर देशभरात एकूण ८९७ माओवादी सदस्यांनी ५४५ शस्त्रांसह आत्मसमर्पण केले आहे. कार्यक्रमाप्रसंगी विशेष पोलिस महानिरीक्षक (माओवादविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र) अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज, सहायक पोलिस अधीक्षक,अनिकेत हिरडे, पोलिस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे उपस्थित होते.

————————————