लॉयड्स मेटल्सतर्फे वर्ल्ड स्पॅरो डे निमित्त चिमण्यांचे महत्त्व पटवून देत जनजागृती कार्यक्रम,

136

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, ता. २३ : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडतर्फे जागतिक चिमणी दिनानिमित्त हेडरी येथील लॉयड्स राज विद्यानिकेतन शाळेत विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना चिमण्यांचे पर्यावरणातील महत्त्व आणि त्यांच्या संवर्धनाची गरज याबाबत जागरूक करणे हा होता.

सदर कार्यक्रम सुरजगड आयर्न ओर खाण प्रकल्पाच्या पर्यावरण विभागामार्फत राबविण्यात आला. यावेळी आयोजित संवादात्मक सत्रात विद्यार्थ्यांना चिमण्यांची पर्यावरणातील भूमिका सविस्तरपणे समजावून सांगण्यात आली. चिमण्या या कीटक नियंत्रण, बियांचे प्रसारण तसेच पर्यावरणाच्या आरोग्याचे निदर्शक म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना चिमण्यांची घटती संख्या ही शहरीकरण, अधिवास नष्ट होणे, कीटकनाशकांचा वाढता वापर आणि प्रदूषण यांसारख्या कारणांमुळे होत असल्याची माहिती देण्यात आली. तसेच या समस्यांचा गडचिरोली जिल्ह्याच्या स्थानिक संदर्भातही आढावा घेण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांना चिमण्यांच्या संवर्धनासाठी सोपे व प्रभावी उपाय सुचविण्यात आले. पक्ष्यांसाठी पाणी व अन्न उपलब्ध करून देणे, घरटी बसविण्यासाठी बॉक्स तयार करणे तसेच नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करणे यांसारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक सवयी रुजण्यास मदत झाली असून जैवविविधतेच्या संवर्धनासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.