लॉयड्सचे प्रशिक्षण पूर्ण होताच २५५ तरुणांना रोजगार ग्लोबल गडचिरोली न्यूज

130

गडचिरोली, ता. २७: लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या ‘लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप’ (LMGSE) या उपक्रमांतर्गत दुसऱ्या प्रशिक्षण बॅचचे यशस्वी पूर्णत्व जाहीर करण्यात आले. २८ जानेवारी २०२६ रोजी सुरू झालेली ही बॅच २६ मार्च २०२६ रोजी पूर्ण झाली असून, तब्बल २५५ युवकांना प्रशिक्षणासोबत तत्काळ रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या.

या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, निवासी संचालक हिम्मत सिंह तसेच कार्यकारी संचालक एस. वेंकटेश्वरन यांची प्रमुख उपस्थिती होती.

LMGSE उपक्रमाच्या माध्यमातून गडचिरोलीसारख्या कौशल्य प्रशिक्षणाच्या मर्यादित संधी असलेल्या भागात सकारात्मक बदल घडत असून, युवकांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्यावर भर दिला जात आहे. औद्योगिक व अनुप्रयुक्त कौशल्ये, लॉजिस्टिक्स, ड्रायव्हिंग आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील उत्कृष्टता केंद्रांद्वारे वेल्डिंग, इलेक्ट्रिकल कामे, वेअरहाऊस ऑपरेशन्स, फूड अँड बेव्हरेज सेवा, हाऊसकीपिंग व रिटेल आदी विविध क्षेत्रांत प्रशिक्षण दिले जाते. पहिल्या बॅचमधील ५२७ उमेदवारांना १००% प्लेसमेंट दिले आहे.

यावेळी बोलताना सुहास गाडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत गडचिरोलीत औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाल्याचे सांगितले. अनेक मोठ्या कंपन्यांच्या आगमनामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच बचत गटातील विधवा महिलांसाठी विशेष प्रशिक्षण बॅच सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी, “आमचे उद्दिष्ट केवळ कर्मचारी तयार करणे नसून उद्योगाचे भागीदार घडवणे आहे. येथे प्रत्यक्ष कामावर आधारित प्रशिक्षण दिले जाते,” असे सांगितले. गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी कंपनी कटिबद्ध असून ‘नवीन जमशेदपूर’ उभारण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कंपनीकडून प्रगत ड्रायव्हिंग स्कूल सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असून महिलांसाठी विशेष ड्रायव्हिंग प्रशिक्षण, शौचालय सुविधा असलेली वाहने आणि मोठ्या वाहनांसाठी (ट्रेलर) प्रशिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे.

आतापर्यंत लॉयड्सने २ हजारांहून अधिक कुशल कामगार घडवले असून, गडचिरोलीच्या विकासाला नवे बळ मिळत असल्याचे चित्र आहे.