ग्लोबल गडचिरोली न्यूज ,
गडचिरोली, ता. ३१ : काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवार (ता. ३०) पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यात उद्योगाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकाविण्याचे षडयंत्र असून सत्ताधारी पक्षाची भागीदारी असल्याचे बेछूट आरोप लावलेले आहेत.या आरोपांचे बेधडक खंडन करत काँग्रेस नैराश्यातून बेछूट आरोप करत आहे, असे भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवार (ता. ३१) पत्रकार परीषदेत सांगण्यात आले.
स्थानिक शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परीषदेला माजी खासदार डॉ. अशोक नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निंबोरकर, किसान मोर्चाचे रमेश भुरसे आदी उपस्थित होते. पत्रकार परीषदेत भाजपची भूमिका मांडताना भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार डॉ. अशोक नेते म्हणाले की, मुळात गडचिरोली जिल्ह्याची ओळख नक्षल प्रभावित जिल्हा म्हणून होती. ती ओळख पुसून येथील युवकांना रोजगार मिळावा या सामाजिक हेतूने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जिल्ह्यामध्ये उद्योगाची मुहूर्तमेढ रोवलेली आहे आणि आज जिल्हा उद्योगाकडे वाटचाल करीत आहे. काँग्रेसचे नेते भेंडाळा व परिसरातील १४ गावांच्या प्रश्नाचा वारंवार राजकारणासाठी उपयोग करीत आहेत. मुळात या क्षेत्राची एमआयडीसीसाठी निवड कोणत्या सरकारच्या कार्यकाळात झाली हे काँग्रेस नेत्यांनी तपासून पहावे. मुळात या क्षेत्राची एमआयडीसी राखीव क्षेत्र म्हणून अगोदरच नोंद झालेली आहे व हा विषय प्रशासनाकडून चाचपणी करून पाहत असताना मात्र काँग्रेसचे नेते भारतीय जनता पक्षावर आरोप करत सुटले आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन हे सर्वपक्षीय असून त्यात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. सर्वपक्षीय मुंडन आंदोलनात काँग्रेस नेते सहभागी होऊन श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्यात आम्हीसुद्धा सहभागी होतो. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय एकाही शेतकऱ्याची शेतजमीन कोणतीही कंपनी घेणार नाही याकरिता आम्ही आग्रही आहोत व जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा शिष्टमंडळाला शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमीन दिली जाणार नाही याची ग्वाही दिलेली आहे. या विषयात भारतीय जनता पक्षा शेतकऱ्यांच्या पूर्णतः पाठीशी आहे.परंतु काँग्रेसची नेतेमंडळी जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून स्वतःच फेक नॅरिटीव्ह जनतेमध्ये पसरवत आहेत व आंदोलन करून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रकार करत आहेत. आजही जमीन सौद्यामध्ये कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते गुंतलेले आहेत व दलाली कोण खात आहेत, हे जनतेला चांगले ठाऊक आहे. काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला शेतकऱ्याची व जनतेशी काही देणे घेणे नाही. फक्त दबाव तंत्राचा वापर करून आपले हप्ते त्यांना वाढवून घ्यावयाचे आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये लोकांची सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी खोटेनाटे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासदृष्टीला साथ देऊन या जिल्ह्याचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे, असेही आवाहन पत्रकार परीषदेत करण्यात आले. यापूर्वीसुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी जिल्ह्यातील श्रद्धास्थान श्री सेमाना देवस्थान येथे १०८ हनुमान चालीसा पठण करण्याचे आंदोलन केले. यानिमित्ताने त्यांना मंदिरात जाण्याची सद्बुद्धी मिळाली हे छानच झाले. परंतु ते देवाशीसुद्धा प्रामाणिक राहू शकले नाहीत. फक्त मंदिरात जाऊन फोटोसेशन करून परत आले. जे देवाशीसुद्धा प्रामाणिक नाहीत त्यांना शेतकऱ्यांची चिंता कशी असेल? जे देवालाही फसवतात ते शेतकऱ्यांच्या व गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या पाठीशी कसे असणार? असे प्रश्नही पत्रकार परीषदेत उपस्थित करण्यात आले.
—————————————










