ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली,ता. 31 : गडचिरोली जिल्हा पोलिस दल व केंद्रीय राखीव पोलिस दलापुढे 9 वरिष्ठ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यात 3 एसीएम पदावरील वरिष्ठ माओवाद्यांसह इतर 6 असे एकूण 9 माओवादी आहेत. त्यामुळे 31 मार्च 2026 पर्यंत माओवाद नष्ट करण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.
पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरातील एकलव्य सभागृहात झालेल्या कार्यक्रमात आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये दसरी ऊर्फ पिडे सन्नु वेको (एसीएम – नॅशनल पार्क डॉक्टर टीम), वय 35 वर्षे, रा. आदवारा, ता. भैरमगड, जि. बिजापूर (छ.ग.), रामजी अडमा पोटाम (एसीएम – सँड्रा दलम नॅशनल पार्क (कृषी विभाग)), वय 40 वर्षे, रा. मोठा पुसनार, ता. व जि. बिजापूर (छ.ग.), शांती वंजा वड्डे (एसीएम – इंद्रावती दलम), वय 35 वर्षे, रा. कवंडे, जि. बिजापूर (छ.ग.), मनकु मासो पोड्याम (सदस्य – सँड्रा दलम) वय 35 वर्षे, रा. डोक्के, ता. भैरमगड, जि. बिजापूर (छ.ग.), सरिता रामा वेलकम (सदस्य – नॅशनल पार्क मोपोस), वय 25 वर्षे, रा. गंगनपल्ली, ता. आवापल्ली, जि. बिजापूर (छ.ग.), लखमी आयतु कुंजाम (सदस्य – मोपोस नॅशनल पार्क), वय 26 वर्षे, रा. गमपूर ता. व जि. बिजापूर (छ.ग.), नंदे जोगा मडे (सदस्य – मोपोस, माड एरीया), वय 22 वर्षे रा. रामगुंडम, ता. कोंटा, जि. सुकमा (छ.ग.), राकेश कोरके मज्जी (सदस्य – सँड्रा दलम नॅशनल पार्क), वय 30 वर्षे, रा. तुमरगुंडा, ता. भैरमगड, जि. बिजापूर (छ.ग.), सुक्की बामी कुंजाम (सदस्य – पामेड एरीया दलम), वय 22 वर्षे, रा. बुसाम, ता. उसुर, जि. बीजापूर (छ.ग.), यांचा समावेश आहे.
यापैकी शांती वंजा वड्डे हिने आपल्या एके 47 रायफल व 30 नग जिवंत काडतुसांसह तसेच सुक्की बामी कुंजाम हिने आपल्या कारबाईन रायफलसह आत्मसमर्पण केले आहे. त्यांनी कवंडे पोलिस स्टेशनपासून 15 किलोमिटर अंतरावर असलेल्या महाराष्ट्र – छत्तीसगड सिमेवरील कुमनार जंगल परिसरात पुरून ठेवलेल्या (डंप) माओवादी साहित्याची माहिती दिली होती. यावरून कुमनार जंगल परिसरातून 1 एके 47 रायफल, 3 – मॅगझीन, 57 जिवंत काडतूस, 3 – वॉकीटॉकी, 4- वॉकीटॉकी बॅटरी, 20 – पेनड्राईव्ह यासह मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे व दारूगोळा हस्तगत करण्यात आला आहे. यासोबतच उर्वरित सात माओवादी हे मागील पाच दिवसांपुर्वीच आत्मसमर्पण करण्यासाठी गडचिरोली पोलिस दलासमक्ष हजर झाले. यादरम्यान या त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी नॅशनल पार्क एरीयातील गुंडापुरी जंगल परिसरात हत्यारे, दारूगोळा व इतर साहित्य जमिनीमध्ये पुरून ठेवले (डंप) असल्याचे सांगितले होते. यावरून गडचिरोली पोलिस दल व छत्तीसगड पोलिसांमध्ये समन्वय साधण्यात येऊन संबंधित ठिकाणावरुन 7.62 एसएलआर – 2 नग, सिंगल शॉट – 1 नग, डेटोनेटर – 50 नग व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे 15 ऑक्टोबर 2025 रोजी पाॅलिट ब्युरो सदस्य, केंद्रीय समिती सदस्य, प्रवक्ता-सीपीआय माओवादी तसेच सचिव-केंद्रीय रिजनल ब्युरो मल्लोजुला वेणूगोपाल राव ऊर्फ भुपती ऊर्फ सोनू याच्यासह एकूण 61 माओवाद्यांनी 54 शस्त्रांसह मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोली आणि संपूर्ण दंडकारण्य विभागातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला होता. गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आली असून भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर देशभरात एकूण 940 माओवादी सदस्यांनी 569 शस्त्रांसह आत्मसमर्पण केले आहे. कार्यक्रमाप्रसंगी उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफचे कमांडंट परविंदर सिंग, चंचल परवाना, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक अहेरी कार्तिक मधीरा, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज , सहायक पोलिस अधीक्षक अनिकेत हिरडे तसेच पोलिस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे उपस्थित होते.पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद आता जवळजवळ संपुष्टात आला असून, कधीकाळी गडचिरोली जिल्ह्यातील 10 उपविभागात सक्रिय असणारी माओवाद चळवळ आता फक्त भामरागड उपविभागाच्या सीमावर्ती भागातच कैद झाली आहे. यासोबतच आजपर्यंत एकूण 805 माओवाद्यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केल्याचेही ते म्हणाले.
————————————










