मतदान प्रक्रियेची सगळी तयारी प्रशासनाकडून पूर्ण

88

गडचिरोली,ता. १७ : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघासाठीचे मतदान शुक्रवार १९ एप्रिल रोजी होणार असून त्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी १७ एप्रिल रोजी पत्रकार परीषदेत दिली. या पत्रकार परीषदेला जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांचीही उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी दैने म्हणाले की, गडचिरोली-चिमुर हा लोकसभा मतदार संघ २००९ मध्ये नव्याने अस्तित्वात आला. तीन जिल्ह्यांत पसरलेला हा मतदारसंघ आदिवासी जमातीसाठी राखीव आहे.या लोकसभा मतदार संघात आरमोरी, गडचिरोली, अहेरी हे गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघ तसेच गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व चिमुर अशा एकूण सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. लोकसभा मतदार संघातील मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार ८ लाख १४ हजार ७६८ पुरूष, ८ लाख २ हजार ४३४ महिला व १० तृतीयपंथी असे एकूण १६ लाख १७ हजार २०७ मतदार आहेत.याशिवाय भारतीय सैन्य दलात कार्यरत १४८३ सेवा मतदार (सर्व्हीस व्होटर) मिळून एकूण मतदार संख्या १६ लाख १८ हजार ६९० झाली आहे. पुरूष मतदारांची टक्केवारी ५०. ३८ तर महिला मतदारांची टक्केवारी ४९. ६२ आहे. १८ ते १९ वयोगटात २४ हजार २६ नवमतदारांनी नोंदणी झाली आहे. यात १३ हजार २६१ पुरूष, १० हजार ७६४ महिला व १ तृतीयपथीं नवमतदाराचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीकरिता विधानसभा मतदार संघनिहाय एकूण १८९१ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. यात आमगाव ३११, आरमोरी ३०२, गडचिरोली ३५६ , अहेरी २९२, ब्रह्मपुरी ३१६ तर चिमुर विधानसभा मतदारसंघात ३१४ मतदान केंद्र राहणार आहेत. यातील १६ मतदान केंद्र महिलांद्वारे नियंत्रीत केली जाणार आहेत, तर ६ मतदान केद्र दिव्यांग व ६ मतदान केंद्र युवा मतदान अधिकाऱ्यांमार्फत नियंत्रीत केली जाणार आहेत. १८९१ मतदान केंद्रांमध्ये ३०० पेक्षा कमी मतदार असलेली ३० मतदान केंद्रे असून ३०० ते ८०० मतदार असलेली ७५५, ८०० ते १००० साठी ५३६, १००० ते १२०० मतदार असलेली ४०३ आणि १२०० ते १५०० मतदार असलेली १६५मतदान केंद्र आहेत. कोणत्याही मतदान केंद्रावर १५०० पेक्षा अधिक मतदार नाहीत. यातील ३१९ मतदान केंद्रे संवेदनशील तर २०० केंद्र अतिसंवेदनशील व १६ मतदान केंद्रांचे तीव्रसंवेदनशील असे वर्गीकरण करण्यात आले आहे. लोकसभा मतदारसंघातील १८९१ मतदान केंद्रांकरिता २३३० बॅलेट युनिट (बीयू), २३३० कंट्रोल युनीट(सीयू) आणि २५१७ व्हीव्हीपॅट उपलब्ध झाल्या आहेत. या मतदान यंत्रांची सरमिसळ निवडणूक निरीक्षक व उमेदवारांचे प्रतीनिधी यांच्या उपस्थितीत करण्यात येऊन ती मतदानासाठी तयार करण्यात आली आहेत. या निवडणुकीसाठी लोकसभा मतदार संघात १६ हजार ३३२ अधिकारी कर्मचारी सेवा देणार असून यात अ-वर्ग ४२७, ब-वर्ग ७९१ , क-वर्ग १३ हजार ९५४ आणि ड-वर्गातील ११६२ कर्मचारी आहेत. यातील ८३८५ मतदान अधिकारी तर २२८ क्षेत्रीय अधिकारी म्हणून निवडणुकीच्या दिवशी काम पाहणार आहेत. याव्यतिरिक्त पोलिस प्रशासनातर्फे सुमारे १६ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांचीदेखील निवडणूक कर्तव्यावर नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी ३४४ जीप, १७७ एस.टी.बस, २३ खासगी बस व ५ एम.आय.-१७ हेलिकॉप्टर याशिवाय आचारसंहिता अंमलबजावणी पथकाकरिता २४ जीप, गृह मतदान तसेच सामान वाहतुकीकरिता १७ मालवाहू गाड्या उपलब्ध करून घेण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुक आचारसंहितेच्या काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस, राज्य उत्पादन शुल्क, आयकर विभाग, अंमली पदार्थविरोधी विभाग व इतर विभागांतील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकांमार्फत तपासणी करण्यात येत आहे. या पथकांमार्फत ११ लाख रोख तसेच ६० हजार ४९४ लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी वृद्ध महिला तसेच नवीन मतदारांना मतदार मित्र (मतदार दोस्ताल) म्हणून MSW, NSS चे ८४० विद्यार्थी मदत करणार आहेत. त्यासोबतच महिला, मुलींना मदत करण्यासाठी मतदार सल्लेख (भगिनी ) म्हणून ५३० मुली (MSW, NSS ) मदत करणार आहेत. आशा वर्कर अंगणवाडी सेविका महिला बचत गट यांच्या मतदान वाढीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्तीला मदत करण्यासाठी दिव्यांग दुताची नेमणूक करण्यात आली आहे. १५० दिव्यांग दूत हे दिव्यांग शाळेचे कर्मचारी असून ते हे काम पाहणार आहेत, असेही जिल्हाधिकारी दैने म्हणाले.

————————————-