तीन जहाल माओवाद्यांसह पेरमिली दलमही संपले

58

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १३ : जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगलात सोमवार (ता. १३) सकाळी झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांनी तीन जहाल माओवाद्यांना कंठस्नान घातले. यात १६ लाखांचे बक्षिस जाहीर असलेल्या विभागीय समिती सदस्यासह दोन महिला माओवाद्यांचा समावेश आहे. विभागीय समिती सदस्य वासू समर कोरचा, रा. गोडीया, पूर्व बस्तर एरीया (छत्तीसगड), रेश्मा मडकाम ( वय २५), रा. बस्तर एरीया (छत्तीसगड) , कमला मडावी ( वय २४), रा. दक्षिण बस्तर एरीया (छत्तीसगड), अशी मृतांची नावे आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील पेरमिली दलमचे हे शेवटचे तीन माओवादी असून त्यांना ठार केल्याने पेरमिली दलम पूर्णपणे संपले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पत्रकार परीषदेत दिली.

  • पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले की, पेरमिली दलमचे काही माओवादी भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात तळ ठोकून असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलिस दलातील विशेष अभियान पथकाचे दोन पथक तातडीने या जंगल परीसरात माओवादविरोधी अभियान राबविण्यासाठी रवाना करण्यात आले. माओवादविरोधी अभियान राबवत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांनी माओवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला.
  • पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. चकमकीनंतर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता घटनास्थळावर १ पुरुष व २ महिला माओवाद्यांचे मृतदेह आढळले. त्यांची ओळख पटली असून वासू कोरचा विभागीय समिती सदस्य तथा पेरमिली दलम कमांडर होता. १ खून, ५ चकमकी, १ दरोडा अशा एकूण ७ गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता. शासनाने त्याच्यावर एकूण १६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. रेश्मा मडकाम कंपनी १० ची सदस्य असून नुकतीच पेरमिली दलममध्ये तिला जबाबदारी देण्यात आली होती. तिचा १ खून, ५ चकमकी अशा ६ गुन्ह्यात सहभाग असून सरकारने ४ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. कमला मडावी पेरमिली दलम सदस्य होती. तिचा २ खून, ५ चकमकी अशा ७ गुन्ह्यांमध्ये सहभाग असून तिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षिस ठेवण्यात आले होते. घटनास्थळावरुन १ एके ४७ रायफल, १ कार्बाइन रायफल, १ इन्सास रायफल व इतर स्फोटक साहित्यासह मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त करण्यात आले. हे अभियान विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदीप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) एम. रमेश व पोलिस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात पार पडले असून सी-६० कमांडोंच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक केले आहे. या चकमकीचे वैशिष्ट्य सांगताना पोलिस अधीक्षक नीलोत्पल पत्रकार परीषदेत म्हणाले की, आमच्या रेकाॅर्डवर पेरमिली दलमचे शेवटच्या तीन सदस्यांची नोंद होती. या चकमकीत ठार झालेल्यांची पडताळणी केली असता ते आमच्या रेकाॅर्डवरील पेरमिली दलमचे शेवटचे माओवादी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पेरमिली दलम आता पूर्णपणे संपले आहे. जिल्ह्यात टिपागड, चातगाव, कसनसूर, अहेरी, पेरमिली, गट्टा व कंपनी क्रमांक १० असे सात दलम आहेत. त्यापैकी पेरमिली दलमचा खेळ खल्लास झाला असून उर्वरीत ६ दलमसुद्धा लवकरच नष्ट होतील, असेही ते म्हणाले. माओवाद्यांचा प्रवक्ता श्रीनिवास याने ३० मे रोजी भारत बंदचे आवाहन केले असले तरी आमचा पोलिस विभाग पूर्णपणे सज्ज असून माओवाद्यांचे सगळे मनसूबे उधळून लावू, असेही ते म्हणाले.