माओवाद्यांचा शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना उद्ध्वस्त गडचिरोली पोलिसांची नारायणपूर पोलिसांसोबत संयुक्त कारवाई; मोठा शस्त्रसाठा जप्त

309

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, ता. २९ : गडचिरोली पोलीस आणि नारायणपूर (छत्तीसगड) पोलिसांनी संयुक्त आंतरराज्यीय अभियान राबवत माओवाद्यांचा शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला. आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रे, स्फोटके आणि शस्त्रनिर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. घटनास्थळीच माओवादी साहित्य नष्ट करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत १ नग इन्सास रायफल, २ नग सिंगल शॉट रायफल, २ नग १२ बोअर रायफल आणि एकूण १८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय २५ किलो आयईडी स्फोटक, २ क्लेमोर, ११० डेटोनेटर, कॉर्टेक्स वायर, ५०० पेक्षा अधिक बीजीएल सेल, ७ बीजीएल लाँचर, ३ ट्यूब लाँचर, लेथ मशीन, मोटार, ग्राइंडर मशीन, इन्व्हर्टर, बॅटरी, सोलर प्लेट आणि अन्य साहित्यही हस्तगत करण्यात आले.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ जवळपास संपुष्टात आली असली तरी सीमावर्ती दुर्गम जंगल परिसराचा वापर करून माओवादी शस्त्रसाठा आणि स्फोटके लपवून ठेवत होते. निवडणुका, नक्षल सप्ताह आणि सुरक्षा दलांवर घातपात करण्यासाठी या साहित्याचा वापर केला जात असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

आत्मसमर्पित माओवाद्यांच्या चौकशीतून पोस्टे काकूर, जिल्हा नारायणपूर (छत्तीसगड) येथून सुमारे ७ किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगतच्या जंगलात शस्त्रनिर्मिती साहित्य लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २६ मे २०२६ रोजी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक प्राणहिता, बीडीडीएस प्राणहिता आणि डीआरजी नारायणपूर यांच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली.

२७ मे रोजी जंगल परिसराची कसून तपासणी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि शस्त्रनिर्मिती साहित्य आढळून आले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळीच धोकादायक साहित्य नष्ट करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी., हर्षवर्धन बी. जे., पोलीस उपअधीक्षक विशाल नागरगोजे आणि मनोज मंडावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत सहभागी जवानांचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले आहे.