नगराध्यक्षा प्रणोती निबोंरकर यांच्या पाठपुराव्याला यश; गोसेखुर्दचे पाणी सोडण्याचे आश्वासन

36

ग्लोबल गडचिरोली न्यूज ,

गडचिरोली, ता . ३० : शहरात वाढत्या उष्णतेमुळे तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा प्रणोती निबोंरकर यांनी आज प्रभारी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

 

यावेळी झालेल्या सविस्तर चर्चेत शहरातील नागरिकांना नियमित, पुरेसा व अखंडित पाणीपुरवठा मिळावा यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. तसेच गोसेखुर्द धरणाचे पाणी तात्काळ वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात यावे, जेणेकरून शहरातील जलसंकटावर काही प्रमाणात मात करता येईल, असेही नगराध्यक्षांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

 

सध्या वाढत्या तापमानामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभारी जिल्हाधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली.

 

चर्चेदरम्यान प्रभारी जिल्हाधिकारी यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेत गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीत सोडण्याबाबत प्रशासन सकारात्मक असून येत्या २ दिवसांत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

 

यावेळी नगराध्यक्षा प्रणोती निबोंरकर यांनी शहरातील नागरिकांना तातडीने दिलासा मिळावा तसेच आगामी काळात पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर होऊ नये यासाठी प्रशासनाने त्वरित निर्णय घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

 

शहरातील नागरिकांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे लागले असून गोसेखुर्द धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय जलसंकटावर दिलासा देणारा ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.