यूआयटी अडपल्लीच्या विद्यार्थ्यांची लॉयड्स मेटल्समध्ये उन्हाळी इंटर्नशिपला सुरुवात

101

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

अडपल्ली, ता . २९ : गोंडवाना विद्यापीठांतर्गत कार्यरत युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (यूआयटी), अडपल्ली येथील सर्व शाखांमधील प्रथम वर्ष व द्वितीय सत्रातील डिप्लोमा विद्यार्थ्यांनी परीक्षा पूर्ण होताच लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल)च्या विविध प्रकल्पांमध्ये उन्हाळी इंटर्नशिप व औद्योगिक प्रशिक्षणास प्रारंभ केला आहे.

दि. २० मे २०२६ रोजी परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग क्षेत्राचा अनुभव मिळावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. याअंतर्गत १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांना बोडली येथील लॉयड्स अकॅडमिक स्किल सेंटरमध्ये प्रशिक्षणासाठी नियुक्त करण्यात आले आहे, तर १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांना कोन्सारी आणि सूरजगड येथील प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षणाची संधी देण्यात आली आहे.

विशेषतः मायनिंग इंजिनिअरिंग शाखेतील विद्यार्थ्यांना सूरजगड मायनिंग प्रकल्पात नियुक्त करण्यात आले असून, त्यांना खाण उद्योगाशी संबंधित प्रत्यक्ष कामकाज, आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावहारिक ज्ञानाचा अनुभव मिळत आहे.

इंटर्नशिपदरम्यान विद्यार्थ्यांना उत्पादन प्रक्रिया, औद्योगिक सुरक्षा, आधुनिक यंत्रसामग्रीचे संचालन तसेच कार्यस्थळ व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जात आहे. अनुभवी अभियंते व उद्योगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी आपली तांत्रिक कौशल्ये विकसित करत असून, शैक्षणिक ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळत आहे.

विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची योग्य व्यवस्था करण्यात आली असून, प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक उत्साहाने सहभाग वाढावा यासाठी कंपनीकडून स्टायपेंड देण्याबाबतही सकारात्मक विचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

हा उपक्रम लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून साकार झाला आहे. विद्यार्थ्यांनी केवळ सैद्धांतिक शिक्षणापुरते मर्यादित न राहता व्यावहारिक औद्योगिक अनुभव, तांत्रिक प्राविण्य आणि उपयोजित ज्ञान आत्मसात करावे, यावर त्यांनी सातत्याने भर दिला आहे.

ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणासोबतच उद्योग क्षेत्रातील अनुभव मिळावा, यासाठी लॉयड्स मेटल्स सातत्याने प्रयत्नशील आहे. कौशल्य विकास, रोजगाराभिमुख प्रशिक्षण आणि औद्योगिक अनुभवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्याचे काम कंपनीकडून केले जात आहे.

शैक्षणिक अध्ययन आणि औद्योगिक कार्यपद्धती यांतील दरी कमी करण्यासाठी हा इंटर्नशिप कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे, रोजगारक्षमता मजबूत करणे आणि त्यांना भविष्यातील यशस्वी करिअरसाठी तयार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, भविष्यातही अशा उद्योग-संलग्न प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.