ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ४ : जिल्ह्यात प्रस्तावित औद्योगिक प्रकल्प, एमआयडीसी आणि विमानतळासाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेविरोधातील संघर्ष अधिक तीव्र झाला असून शेतकऱ्यांनी बुधवार (ता. ३) ‘जमीन वाचवा, जिल्हा वाचवा’ असा अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बैलगाड्यांसह बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे.
सकाळपासूनच गडचिरोलीसह चामोर्शी तालुक्यांतील शेतकरी इंदिरा गांधी चौकात जमा झाले होते. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले. आंदोलन दीर्घकाळ चालण्याची शक्यता गृहीत धरून अनेक शेतकरी बैलगाड्या, अन्नधान्य, पिण्याचे पाणी तसेच स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य घेऊनच आंदोलनस्थळी दाखल झाले. कडक उन्हाची पर्वा न करता शेतकऱ्यांनी आपला निर्धार कायम ठेवला. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघर्ष कृती समितीने गेल्या काही महिन्यांपासून जमीन अधिग्रहणाविरोधात विविध आंदोलनांची मालिका सुरू ठेवली आहे. या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व इतर राजकीय पक्षांसह तेली, कुणबी, कलार व अनेक समाजाच्या संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही आंदोलनस्थळी उपस्थित होते. या आंदोलनादरम्यान महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शासनाच्या धोरणांवर टीका केली. गडचिरोली तालुक्यातील हिरापूर, गुरवळा, राखी आणि शिरपूर चक परिसरात प्रस्तावित विमानतळासाठी करण्यात येत असलेल्या जमीन अधिग्रहणाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील १४ गावांनी जमीन देण्यास स्पष्ट नकार दिला असतानाही शासनाने जयरामपूर परिसरातील आणखी १३ गावांमध्ये अधिग्रहण प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांशी कोणतीही सविस्तर चर्चा न करता केवळ औद्योगिक प्रकल्पांच्या हितासाठी सुपीक शेती जमीन संपादित केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी इतर नेत्यांनीही आपल्या भाषणातून जमीन अधिग्रहणावर कडाडून टीका केली. ‘जमीन वाचवा, जिल्हा वाचवा’ हा नारा लिहिलेल्या टोप्या घातलेल्या आंदोलकांमुळे हे आंदोलन वैशिष्ट्यपूर्ण ठरले. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रानटी हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी आधीच त्रस्त आहेत. एकीकडे मानव-वन्यजीव संघर्ष वाढत असताना उपजीविकेचा आधार असलेल्या जमिनींच्या संपादनाविरोधात शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. हे केवळ एक दिवसाचे आंदोलन नसून बेमुदत ठिय्या आंदोलन आहे. शेतकरी मुक्कामाच्या पूर्ण तयारीने आले आहे. त्यामुळे हे आंदोलन दीर्घकाळ चालण्याचे संकेत मिळत आहेत. म्हणून हे आंदोलन प्रशासनापुढे मोठे नवे आव्हान ठरले आहे. आता या आंदोलनाची दखल सरकार कशा प्रकारे घेते, याकडे जिल्हावासींचे लक्ष लागले आहे. गडचिरोली तालुक्यातील गुरवळा, हिरापूर, शिरपूर चक, राखी या गावांमध्ये प्रस्तावित विमानतळाकरिता जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पाकरिता (चित्तरंजनपूर, क्रिष्णापूर, येनापूर, दुर्गापूर, सेलूर, लक्ष्मणपूर, गणपूर, विठ्ठलपूर, मुधोली तुकुम, जयरामपूर, बामणीदेव, यादवपल्ली, पारडीदेव) या १३ गावांतील तसेच (घारगाव, रामाळा, फोकुर्डी, दोटकुली, खंडाळा, भेंडाळा, वाघोली, सगनापूर, वेलतूर रीठ, कान्हाली, नवेगाव माल, चाकलपेठ, मोहर्ली मो., फराडा) या १४ गावांतील शेतजमीन अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव होता. सध्या संबंधित १४ गावांतील जमिनीच्या खरेदी-विक्रीवर प्रशासनामार्फत निर्बंध लावण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनी खरेदी किंवा विक्री करण्यासाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी घ्यावी लागत आहे. त्यामुळे ही गावे अडचणीत आली आहेत. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मुख्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण असून शेतकऱ्यांची मोठी गर्दी आणि आंदोलनाची संभाव्य तीव्रता लक्षात घेता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.











