कुरूड गावातील रहस्यमय हत्येचा पोलिसांनी केला पर्दाफाश

308

गडचिरोली, ता. ८ : कोणताही दुवा किंवा पुरावा न सोडता करण्यात आलेल्या हत्या प्रकरणाचा गडचिरोली पोलिसांनी कौशल्याने तपास करून आरोपीला अखेर अटक केली आहे. विकास जनार्दन बोरकर (वय ५० वर्षे) रा. कुरूड ता. देसाईगंज, जि. गडचिरोली, असे आरोपीचे नाव आहे, तर प्रदीप ऊर्फ पांड्या विजय घोडेस्वार (वय ३० वर्षे) रा. कुरूड, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली, असे मृताचे नाव आहे.

अज्ञात आरोपीने कोणत्यातरी साधनाने मृत प्रदीप ऊर्फ पांड्या विजय घोडेस्वार याच्या डोक्यावर मारून त्याला गंभीर जखमी केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची घटना घडली होती. त्यानुषंगाने देसाईगंज पोलिस स्टेशन येथे मर्गअन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आरोपीने कोणत्याही स्वरूपाचा पुरावा अथवा दुवा मागे सोडलेला नसल्याने या गुन्ह्यातील अनोळखी आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करणे हे गडचिरोली पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. घटनेचे गांर्भीय लक्षात घेत पोलिस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात गुन्हा उघडकीस आणून आरोपीस अटक करण्याकरिता कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांनी पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या नियंत्रणात एक तपास पथक नियुक्त करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या गुप्त तपासात असे लक्षात आले की, मोलमजुरी करणारा आरोपी विकास बोरकर याची पत्नी व मुलगीकडे मृतक वाईट नजरेने बघायचा व त्यांना त्यांच्या घरासमोर येऊन अश्लील शिवीगाळ करायचा. त्यामुळे मृत व आरोपी यांच्यात नेहमी झगडा भांडण होत होते. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री १० ते १०.३० वाजता दरम्यान मृताने आरोपीस अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याने आरोपी विकास बोरकरने प्रदीप घोडेस्वारच्या डोक्यात सिमेंटच्या कवेलूने मारून गंभीर जखमी करून खून केल्याची माहिती समोर आली. या गोपनीय माहितीच्या आधारावर आणि साक्षिदारांच्या बयाणावरून आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सोमवार (ता. ११) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता तसेच कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात देसाईगंज पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, पोलिस नायक राऊत, पोलिस अंमलदार ढोके, कुमोटी, सराटे व शैलेश तोरपकवार यांनी केली.

——————————–