सर्वांगीण विकासासाठी क्रीडा प्रशिक्षण शिबिरे महत्वपूर्ण-कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

98

ग्लोबल गडचिरोली न्यूज

20 दिवसीय योगा व क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप.

 

गडचिरोली, दि. 12: विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि आत्मिक विकासासाठी खेळ अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. खेळातून कुशलता, डावपेच, अचूकता, शोधवृत्ती, आरोग्य सदृढता आदी मूल्यांची जपणूक होत असून खेळाडू घडविण्याचे मुख्य स्त्रोत प्रशिक्षण शिबीर आहे. अशा क्रीडा प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांवर शारीरिक व मानसिक संस्कार केले जातात. खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा प्रशिक्षण शिबिरे महत्वपूर्ण ठरतात, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले.

आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवनच्या वतीने आयोजित योग व क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप आनंद निकेतन महाविद्यालयाच्या प्रांगण्यात झाला, याप्रसंगी ते बोलत होते.

 

कार्यक्रमाला महारोगी सेवा समितीचे संचालक डॉ. विकास आमटे, उपविभागीय पोलीस अधिकारी नवमी साटम, आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मृणाल काळे, उपप्राचार्या डॉ.राधा सवाने, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, समाजाला सकारात्मक दिशेने नेण्याचा “आनंदवन” चा संकल्प असून भावी पिढी घडविण्याचे कार्य “आनंदवन” करीत आहे. आनंदनिकेतन महाविद्यालयाने योगा व क्रीडा प्रशिक्षण शिबिर उपक्रम पाच वर्षांपूर्वीच सुरू केला. आज लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांचा कल मोबाईल वापराकडे अधिक दिसून येतो हे टाळायला हवे. मुलांवर कोणते संस्कार करावेत हे पालकांना ठरवायचे असते. पालकांनी या शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्यामुळे 736 विद्यार्थी या क्रीडा प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊ शकले. या 20 दिवसीय शिबिरात हजारो खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. समाजाला सकारात्मक दिशेने नेण्याचा आनंदनिकेतन महाविद्यालय व आनंदवनचा 75 वर्षापूर्वीचा संकल्प होता. तो या शिबिराच्या माध्यमातून अभिव्यक्त होताना दिसत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.

 

डॉ. बोकारे पुढे म्हणाले, आनंदवन एक-दोन नव्हे तर निरंतर पाच वर्षापासून योग व क्रीडा प्रशिक्षणाचा उपक्रम चालवीत आहे. आनंदवन जसे 75 वर्षे अविरतपणे सुरू आहे तसेच हा उपक्रम सुद्धा येणाऱ्या 75 वर्ष अविरतपणे सुरू राहील, हे आनंदवनच्या सामाजिक तळमळीची पावती असल्याचेही ते म्हणाले. त्यासोबतच, श्रद्धेय बाबा आमटे यांनी 75 वर्षांपूर्वी लावलेल्या आनंदवनसारख्या ज्योतीचे, दिव्यात व त्यानंतर मशालीत रूपांतर झाले. पुढे याच मशालीचे सूर्यात रूपांतर होणार असल्याचा विश्वास डॉ.बोकारे यांनी व्यक्त केला.

 

श्रद्धेय बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आनंदवन उभे केले. आनंदवनात बाबा आमटे यांची तिसरी ते चौथी पिढी कार्यरत असल्याचे डॉ.विकास आमटे यांनी सांगितले. आनंद निकेतन महाविद्यालय येथे आयोजित क्रीडा प्रशिक्षण शिबिराला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झालेत. याबद्दल त्यांनी पालकांचे अभिनंदन केले. त्यासोबतच, आनंदवनातील कुष्ठरुग्ण व अंधांसाठी थेरेपेटीक स्विमिंग पूल, व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण आणि व्यसनमुक्तीकडे वाटचाल आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही डॉ.आमटे यांनी यावेळी सांगितले.

 

उपविभागीय पोलिस अधिकारी नवमी साटम म्हणाल्या, जीवनात लागणारे कौशल्य व मूल्य खेळातूनच मिळतात. खेळातून विद्यार्थी सहकार्याचे मूल्य, प्रभावी संवाद आणि सांघिक कार्य शिकतात. खेळ अनेकदा विद्यार्थ्यांना संघाचा कर्णधार किंवा प्रशिक्षक यासारख्या नेतृत्वाची भूमिका स्वीकारण्याची संधी देतात यातून विद्यार्थ्यांच्या अंगी नेतृत्वाची भावना वाढीस लागते. तसेच खेळ विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील इतर क्षेत्रांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यास मदत करते. त्यासोबतच विद्यार्थ्यांना अनुशासन हे मैदानातूनच मिळत असते. खेळातून ध्येयनिश्चित करणे व ते साध्य करणे विद्यार्थी शिकू शकतात. त्यामुळे भविष्यात शैक्षणिक आणि करिअरच्या उद्दिष्टांसाठी ही कौशल्ये अमूल्य असल्याचेही त्या म्हणाल्या.

 

*विद्यार्थ्यांना पारंपरिक खेळ व क्रिडाप्रकारांचे प्रशिक्षण:*

वीस दिवसीय शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना 28 विविध क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण नियमित दिल्या गेले. यामध्ये योगासन, कराटे, क्रिकेट, फुटबॉल, एरोबिक्स, मल्लखांब, नेटबाॅल, खो-खो, बॅडमिंटन आदींचे प्रशिक्षण देण्यात आले.

 

*प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांकडून विविध खेळ प्रकार आणि कवायतीचे सादरीकरण:*

सदर शिबिरामध्ये योग कवायत, लाठी कवायत, दंडबैठक कवायत, घुंगरू काठी, रोप मल्लखांब, लेझिम, कराटे, सूर्यनमस्कार आदी खेळ प्रकार, कवायत व प्रात्यक्षिकाचे सादरीकरण प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांकडून करण्यात आले.

 

*उत्कृष्ट प्रशिक्षक व शिबिरार्थींचा सत्कार:

विवेक दुबे, अक्षिता तिखट, दीपक शिव, कुणाल दातारकर, मयुरी गाडगे, नरेंद्र कन्नाके, उषा उरकुडे, प्रियंका कडस्कर, चेतन चिंचोळकर, पंकज शेंडे, श्रीकांत लोहकरे, अक्षिता तिखट, सायली उपरे आदी प्रशिक्षकांचा तसेच आर्यन काळे, आयुष महल्ले, कस्तुर राऊत, विधी भोगेकर, शुभ्रा ठाकरे आदी शिबिरार्थींचा मान्यवरांच्या हस्ते

सत्कार करण्यात आला.