बद्धकोष्ठता आणि अपचनासारखे वायुविकार (गॅस तयार होणे) ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. महिला, पुरुष, वृद्ध आणि लहान मुलेही वाताच्या विकाराने त्रस्त होताना दिसतात. या रोगात पोट फुगणे, पोटात हवा, पोटात तणाव जाणवणे, आवाजासह ढेकर येणे, अशी लक्षणे दिसू येतात. या आजाराचे मुख्य कारण म्हणजे आपल्या चुकीच्या खाण्याच्या सवयी. खूप लवकर खाणे, चुकीच्या वेळी अन्न खाणे, खाताना बोलणे, जेवताना जास्त प्रमाणात पाणी पिणे आणि जास्त मसालेदार अन्न घेणे, यामुळे वाताचे विकार वाढतात. खूप गरम आणि खूप थंड अन्न खाल्ल्यामुळेसुद्धा ही स्थिती उद्भवते. मनाची चंचलता, रात्रीचे जागरण आणि राग, चिडचिड हे देखील वायू विकाराचे एक मोठे कारण आहे.
यावर उपचार काय ?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे हा वायुविकाराचा उत्तम उपचार आहे. असे असले तरी नैसर्गिक उपाय योग्य पद्धतीने केले तर त्याचा लवकर फायदा होतो. लिंबू पाणी किंवा त्रिफळा चूर्णाचा एनिमा घेऊन पोट साफ केल्यानंतर मातीची पट्टी आणि कटीस्नान घ्यायला हवे. आहारातून हवा निर्माण करणारे ( तळलेले )पदार्थ काढून टाकून हलका व सात्विक आहार, हिरव्या पालेभाज्या, कोशिंबीर (सलाद), दुपारच्या जेवणात ताक यांचा समावेश करावा. जेवताना न बोलता जेवण करावे. अन्न नीट चावले जाते की नाही, याची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून अन्न गिळताना जास्तीत जास्त लाळ पोटात गेली पाहिजे. जेवण करताना मन शांत ठेवणेही खूप आवश्यक आहे.
योगिक क्रिया : कुंजल ( वमन क्रिया , उपाशी पोटी कोमट पाणी पिऊन मुखावाटे बाहेर काढणे )नंतर सकाळी रिकाम्या पोटी योगिक सूक्ष्म व्यायाम करून पोटाची शक्ती वाढवण्याची क्रिया करावी. नाभीभोवती आसनांचा सराव केल्यानंतर कटिचक्रासन, उर्ध्व हस्तोत्तानासन, पाद हस्तासन, सुप्त पवनमुक्तासन, भुजंगासन, वज्रासन, मंडुकासन, कूर्मासन, मयुरासन आणि अर्धमत्स्येंद्रासन या आसनांचा सराव करावा. भस्त्रिका आणि सूर्यभेदी प्राणायामाचा वापर या आजारात अतिशय उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. या रोगावर अग्निसार व नौली या क्रिया रामबाण उपाय म्हणून काम करतात.
– डॉ. अनिल एन. निकोडे
(निसर्गोपचार चिकित्सक)
अंतरंग योग व निसर्गोपचार केंद्र, गडचिरोली
—————————————-