गडचिरोली, ता. ७ : अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल महिला माओवाद्यांना व टिटोळा गावच्या पोलिस पाटलाच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या एका जनमिलिशीयास गडचिरोली पोलिस दलाने रविवार (ता. ७) अटक केली. विशेष म्हणजे या दोन जहाल महिला माओवाद्यांवर सरकारने साडे पाच लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते.
सविस्तर वृत्त असे की, आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर विघातक कृत्य करण्याच्या तसेच सुरक्षा दलाच्या हालचालींचा आढावा घेण्याच्या हेतूने जहाल महिला माओवादी काजल ऊर्फ सिंधू गावडे,(वय २८) रा. कचलेर. ता. एटापल्ली, जि. गडचिरोली व गीता ऊर्फ सुकली कोरचा (वय ३१) रा. रामनटोला, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली या दोघी गडचिरोली-कांकेर (छत्तीसगड) सीमेवरील पिपली बुर्गी पोलिस स्टेशन हद्दीतील जवेली जंगल परीसरात संशयितरित्या फिरत आहेत, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष अभियान पथकाचे जवान, पिपली बुर्गी पोलिस स्टेशन पथकाचे जवान तसेच केंद्रीय राखीव पोलीस बल जी -१९२ बटालियनच्या जवानांनी या जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबवून त्यांना ताब्यात घेतले. अधिक तपासात असे दिसून आले की, २०२० साली कोपर्शी – पोयारकोटी जंगल परिसरात पोलिस – माओवादी चकमक झाली ज्यात गडचिरोली पोलिस दलातील एक अधिकारी व एक जवान शहीद झाले होते. या चकमकीत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना या चकमकीच्या अनुषंगाने भामरागड पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. यासोबतच मागील वर्षी २०२३ मध्ये टिटोळा ते पामाजीगुडा जंगल परिसरात नोव्हेंबर २०२३ मध्ये टिटोळा पोलिस पाटलाच्या हत्येच्या अनुषंगाने एटापल्ली पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील आरोपी जनमिलिशीया पिसा पांडू नरोटे, रा. झारेवाडा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो गिलनगुडा जंगल परिसरात लपून बसलेला असल्याच्या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गट्टा (जां.) पोलिस स्टेशनचे पथक व केंद्रीय राखीव पोलिस दल ई -१९१ बटालियनच्या जवानांनी विशेष अभियान राबवून त्याला अटक केली. काजल ऊर्फ सिंधू गावडे २०१२ मध्ये प्लाटून क्र. ५५ मध्ये सदस्य या पदावर भरती होऊन २०१९ पर्यंत कार्यरत होती. २०१९ मध्ये कंपनी क्र. ४ मध्ये बदली होऊन २०२० पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होती. २०२० पासून डीव्हीसी (डिव्हीजनल कमिटी) स्टाफ टीम/प्रेस टीममध्ये सदस्य पदावर आतापर्यंत कार्यरत होती. २०१९ मध्ये नारकसा जंगल परिसरातील चकमक, २०१९ मध्ये दराची सिंदेसुर जंगल परिसरातील चकमक, २०१९ मध्ये बोधीनटोला जंगल परीसरातील चकमक, २०२०मध्ये किसनेली पहाडी जंगल परिसरातील चकमक, २०२१ मध्ये फुलकोडो जंगल परिसरातील चकमक, २०२१ मध्ये खोब्राामेंढा जंगल परिसरातील चकमक, २०२१ मध्ये मोरचूल जंगल परिसरातील चकमक अशा ७ चकमकीत तिचा सहभाग होता. तसेच २०१९ मध्ये कनेली जंगल परिसरातील जमिनीत स्फोटके पुरून ठेवण्यात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.२०१९ मध्ये पुसेर साखरदेव जंगल परिसरातील जमिनीत स्फोटके पुरून ठेवण्यात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. गीता ऊर्फ सुकली कोरचा २०१८ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सप्टेंबर २०२० पर्यंत कार्यरत होती. सप्टेंबर २०२० मध्ये माड एरीयामध्ये बदली होऊन सदस्य पदावर आतापर्यंत कार्यरत होती.
२०१९ मध्ये मोरोमेट्टा – नेलगुंडा जंगल परीसरात पोलिसांसोबत झालेली चकमक, २०२०मध्ये कोपर्शी-पोयारकोटी जंगल परिसरातील चकमक, २०२१ मध्ये कोपर्शी जंगल परिसरातील चकमक अशा तीन चकमकीत तिचा सहभाग होता. तसेच २०२० मध्ये कोठी येथे झालेल्या एका पोलिस जवानाच्या हत्येमध्ये तसेच २०२१ मध्ये कोठी ते भामरागड रोडवर झालेल्या एका निरपराध व्यक्तीच्या हत्येमध्ये तिचा सहभाग होता. जनमिलिशीया पिसा पांडू नरोटे २०१८ पासुन गावात राहुन जनमिलिशीया म्हणून माओवाद्यांसाठी राशन आणून देणे, सेंट्री ड्युटी करणे, माओवाद्यांचे हत्यार लपवून सुरक्षीत ठिकाणी ठेवणे, निरपराध व्यक्तींचे खून करण्याआधी रेकी करून त्याची माहिती माओवाद्यांना पुरविणे, पोलिस पथकाबद्दल माहिती देणे तसेच माओवाद्यांची पत्रके जनतेपर्यंत पोहचविणे व इतर काम करत होता. २०२१ पासून जनमिलिशीया कमांडर म्हणून काम करत होता. २०२२मध्ये झारेवाडा येथील निरपराध व्यक्तीच्या खुनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. २०२२ मध्ये गोरगुट्टा येथील निरपराध व्यक्तीच्या खुनात व २०२३ मध्ये टिटोळा ते पामाजीगुडा जंगल परिसरात झालेल्या टिटोळा पोलिस पाटलाच्या हत्येमध्येअशा तीन खून प्रकरणात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. याशिवाय २०१९ मधील लोकसभा निवडणूकीदरम्यान टिटोळा गावात स्फोटके जमिनीत पुरून ठेवण्यात माओवाद्यांना मदत केली होती. महाराष्ट्र शासनाने काजल ऊर्फ सिंधू गावडे हिच्या अटकेवर २ लाख रुपयांचे, गीता ऊर्फ सुकली कोरचा हिच्यावर २ लाख रुपयांचे व पिसा पांडू नरोटे याच्यावर दीड लाख रुपयांचे बक्षीस जाहिर केले होते.
—————————–