खा.अशोक नेते यांच्यासाठी अभिनेत्री रिमी सेनचा रोड शो
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात आज जाहीर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुतीच्या वतीने गडचिरोली शहरातून रॅली काढण्यात आली. विशेष म्हणजे हिंदी सिने अभिनेत्री रिमी सेन हिने काही अंतरापर्यंत या रोड-शो मध्ये सहभागी होऊन गडचिरोलीकरांना कमळाला मतदान करण्याचे आवाहन केले.
महायुतीचे उमेदवार तथा खासदार यांच्या चामोर्शी मार्गावरील प्रचार कार्यालयापासून या रॅलीची सुरूवात करण्यात आली. उन्हाचा पार चढलेला असतानाही मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. खुल्या वाहनावर खा.अशोक नेते यांच्यासह रिमी सेन आणि भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) पदाधिकारी विराजमान होते. इंदिरा गांधी चौक, चंद्रपूर रोड, बेसिक शाळा, वंजारी मोहल्ला, तेली मोहल्ला, राम मंदिर, आरमोरी रोड, धानोरा रोड, शिवाजी कॉलेज या मार्गे फिरल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला.
धूम, हंगामा, फिर हेराफेरी अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या रिमीला पाहण्यासाठी गडचिरोलीकर मार्गात उभे होते. ही रॅली ज्या भागातून फिरत होती त्या भागात कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण केली जात होती. रॅलीच्या पुढे फटाके फोडले जात होते. त्यांच्यामागे मोटारसायकल रॅली आणि त्यामागे पायी चालणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असे या रॅलीचे स्वरूप होते. कडक ऊन असतानाही डिजेच्या तालावर उत्साहपूर्ण वातावरण या रॅलीचा समारोप झाला.
देशात विकासात्मक दृष्टी असलेले सक्षम आणि धाडसी निर्णय घेणारे मोदींच्या नेतृत्वातील सरकार विराजमान करण्यासाठी या मतदार संघातील नागरिकांचा पुन्हा एकदा मला आशीर्वाद मिळेल, असा विश्वास यावेळी खा.अशोक नेते यांनी व्यक्त केला.