कबुतर चोरले म्हणून चार चिमुकल्यांना बेदम मारले

70

गडचिरोली, ता. ६ : केवळ कबुतर चोरले म्हणून एका युवकाने चार चिमुकल्यांना बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे ही घटना घडली तेव्हा या युवकाचे वय १८ वर्षांचे व्हायला काहीच दिवस शिल्लक होते. त्यामुळे त्याची विधिसंघर्षग्रस्त बालक म्हणून नोंद करून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथे ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाची चित्रफीत समाज माध्यमावर ‘व्हायरल’ होताच पोलिसांनी आरोपी अल्पवयीन युवकावर गुन्हा दाखल केला आहे. मंगळवार (ता. ६) आरोपीला बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात आले.

देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथे राम मंदिर परिसरात चार चिमुकल्यांना अमानुषपणे मारहा करण्यात आली होती. या मारहाणीची चित्रफित समाज माध्यमांवर सार्वत्रिक झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या चित्रफितीत एक अल्पवयीन आरोपी चार चिमुकल्यांना बेदम मारहाण करताना दिसून येत आहे. आरोपीच्या वडिलांची देसाईगंज येथे रक्त तपासणी प्रयोगशाळा असून तो अल्पवयीन आहे. या अल्पवयीन आरोपीने पीडित चिमुकल्यांवर कबुतर चोरल्याचा आरोप केला. एवढ्यावरच न थांबता त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लाकडी दांड्याने मारताना व जवळ असलेल्या सळाखीवर त्या चिमुकल्यांना उचलून फेकून दिले. चित्रफितीत एक प्रौढ व्यक्तीसुद्धा चिमुकल्यांचा बचाव करताना दिसत आहे. परंतु, आरोपी त्याचे काहीही न ऐकता चिमुकल्यांना बेदम मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. घटनेच्या तब्बल १५ दिवसांनंतर ही चित्रफित समाजमाध्यमांवर सार्वत्रिक होताच देसाईगंजमध्ये संतापाची लाट उसळली. ५ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास पीडित बालकांचे आई-वडील, नातेवाइक व नागरिक आरोपीच्या कस्तुरबा वाॅर्डातील घरापुढे गोळा झाले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही बाब पोलिसांना समजताच त्यांनी जमावाला शांत करून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. या घटनेतील आरोपीने ४ ऑगस्ट रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र, ही मारहाण झाली तेव्हा तो अल्पवयीन होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २० जुलै रोजीची आहे. त्यामुळे आरोपीची बाल गुन्हेगार म्हणून नोंद करण्यात आली. दरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात देसाईगंजचे पोलिस निरीक्षक अजय जगताप म्हणाले की, ही घटना २० जुलै रोजीची असून ५ तारखेला चित्रफित सार्वत्रिक झाल्यानंतर उघडकीस आली. पीडित मुलांनीदेखील त्याबद्दल कुठे वाच्यता केली नव्हती. गुन्ह्याच्या वेळेस आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याची विधीसंघर्षग्रस्त म्हणूनच नोंद करण्यात आलेली आहे, असे ते म्हणाले.

———————————-