ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १५ : गडचिरोलीच्या आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागांपर्यंत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ पोहचला. शासकीय योजना सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी शासन व प्रशासन मनापासून काम करत असल्याची ही फलश्रुती असून याचा मला आनंद आहे या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय योजना प्रभावीपणे राबवित असल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे कौतुक आणि अभिनंदन केले.
शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ व ‘मुख्यमंत्री युवा कार्य योजने’च्या लाभार्थींशी मुख्यमंत्री शिंदे यांनी १५ आॅगस्ट रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. गडचिरोलीतून जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची राज्यातील पहिली लाभार्थी सोनाली गेडाम यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मनोगत व्यक्त केले. कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी चेतन हिवंज, शिक्षणाधिकारी बी. एस. पवार, बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती कडू याप्रसंगी उपस्थित होते. सोनाली गेडाम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधतांना ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ कार्यान्वित केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांना धन्यवाद दिले व राज्याची प्रथम लाभार्थी होण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. प्रशिक्षणार्थी अनुभवाचा लाभ नोकरीसाठी आणि विद्यावेतनाचा लाभ पुढील शिक्षणासाठी होईल, असेही त्यांनी सांगितले.
—————–
गडचिरोली पोलिस दलाने ५५ किमी पायी चालत केले ध्वजारोहण
गडचिरोली, ता. १५ : भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापनदिनी गडचिरोली पोलिस दलाने नक्षलवाद्यांचे वर्चस्व असलेला परीसर मानल्या जात असलेल्या कतरनगट्टा व पेनगुंडा या अतिदुर्गम गावांमध्ये तब्बल ५५ किमी अंतर पायी पार करून राष्ट्रध्वज फडकवत येथील जनतेला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि निर्भयतेचा संदेश दिला.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिाटिशांपासून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले म्हणून संपूर्ण भारत देशात हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या शुरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या वीरांचे स्मरणही या दिवशी केले जाते. या अनुषंगाने स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलिस दलातील १७ पोलिस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती यांचे पोलिस शौर्य पदक व एक पोलिस अधिकारी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहिर झाले होते. या कार्यक्रमाप्रसंगी पदक विजेत्यांचा प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देऊन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यासोबतच पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी उपस्थित सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या व शहीद कुटूंबियांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. विशेष बाब म्हणजे उपविभाग भामरागडअंतर्गत मौजा पेनगुंडा या गावात भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते यांच्या नेतृत्वात धोडराज पोलिस स्टेशनचे पथक, २ सी-६० पथके व १ सीआरपीएफ पथक यांनी २० किमी पायी अभियान करत ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन साजरा केला. तसेच अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांच्या नेतृत्वात नारगुंडा पोलिस स्टेशनचे पथके, २ सी-६० पथके व १ सीआरपीएफ पथक यांनी ३५ किमी पायी अभियान करत माओवादग्रस्त अतिसंवेदनशील अशा कत्रंगट्टा येथे भेट देऊन ग्रामस्थांसोबत ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन साजरा केला. १३ मे २०२४ रोजी याच कत्रंगट्टा गावाच्या जंगल परीसरात माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये एक डीव्हीसीएम (Divisional Committee Member) दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह एक कंपनी सदस्य व एक दलम सदस्य अशा एकूण ३ जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात व माओवाद्यांचे संपूर्ण पेरमिली दलमचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश प्राप्त झाले होते. माओवादी अशा अतिदुर्गम गावांमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी काळे झेंडे फडकविण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र गडचिरोली पोलिस दलाने त्यांचे मनसुबे उधळून लावत १५ ऑगस्ट रोजी दुर्गम-अतिदुर्गम भागांमध्ये व विविध पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्र येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला. तसेच अतिदुर्गम भागातील नागरिकांसह हर घर तिरंगा मोहिमेमध्येदेखील उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यासोबतच गेल्या एका वर्षभरात नव्याने उभारलेल्या वांगेतुरी पोलिस स्टेशन व गर्देवाडा पोलिस मदत केंद्र या ठिकाणीदेखील ग्रामस्थांनी पोलिस दलासोबत स्वातंत्र्यदिन साजरा करत ध्वजारोहण कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदविला. या अतिदुर्गम भागातील युवकांसाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करून सोबतच विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. गडचिरोली पोलिस दलाकडून जिल्ह्यात विविध पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्र स्तरावर अतिदुर्गम भागांमध्ये ग्रामस्थांच्या सहभागाने राष्ट्रध्वजासोबत मिरवणूका काढण्यात आल्या. यासोबतच पोलिस मुख्यालय, गडचिरोली येथे अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या हस्ते ध्वजारोहणचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्र येथे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
—————