शिकारीसाठी लावलेल्या वीजतारेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

43

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

चामोर्शी, ता. २५ : तालुक्यातील आष्टी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वसंतपूर फार्म कॉम्प्लेक्सच्या जंगलात वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी टाकलेल्या विद्युत तारेच्या धक्क्याने वसंतपूर येथील युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी आहे. ही घटना सोमवार (ता. २३)घडली. मृत व जखमी तरुण मोहाची दारू गाळण्यासाठी जात होते, अशी माहिती समोर आली आहे.

दीपक दिलीप सरकार (वय २१) असे मृत युवकाचे नाव आहे, तर आकाश आशुतोश मिस्त्री (वय १७) हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वसंतपूर गावातील काही अज्ञात आरोपींनी वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी सोमवारी रात्री शेत संकुलाच्या जंगलात वीजतारा टाकल्या होत्या. दरम्यान, रात्री दीपक आणि आकाश हे दुचाकीवर बसून जंगलातील हातभट्टीवर मोहाची दारू गाळायला जात होते. दरम्यान, शिकारीसाठी लावलेल्या वीज प्रवाहाला स्पर्श झाल्याने दीपकचा जागीच मृत्यू झाला. आकाश गंभीर जखमी झाला. घटनास्थळी शिकार केलेले रानडुकर आढळून आल्याची माहिती आहे. या प्रकरणी निष्काळजीपणा करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात आरोपींवर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अद्याप पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचता आलेले नाही. तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांनी सागितले.

—————————————