गडचिरोली पोलिसांनी चारचाकी वाहन व अवैध दारूसह जप्त केला ९ लाख २६ हजारांचा मुद्देमाल

74

ग्लोबल गडचिरोली न्यूज ,

गडचिरोली, ता. १ : स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीच्या पोलिस पथकाने ३१ मार्च रोजी कारवाई करत चारचाकी वाहन व अवैध दारूसह ९ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

कुनघाडा रै, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली येथील रहिवासी गोलू मंडल हा त्याच्या साथीदारासह एका लाल रंगाच्या एक्स यू व्ही ५०० या चारचाकी वाहनात चामोर्शी ते घोट, कृष्णनगर मार्गे देशी-विदेशी दारूची वाहतूक करणार आहे, अशा मिळालेल्या गोपनीय माहितीवरून या मार्गावर चामोर्शी पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी संयुक्तपणे नाकाबंदी करून सापळा रचला होता. यादरम्यान पोलिस पथकांना संशयीत चारचाकी वाहन भरधाव वेगाने येताना दिसल्यावर पोलिसांनी वाहनाला थांबण्याचा इशारा केला. मात्र वाहन जंगलाच्या दिशेने वळवून आरोपी वाहन जंगलात सोडून पळून गेले. यानंतर पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता त्यात विदेशी दारूचे १५ बॉक्स किंमत २ लाख १६ हजार रुपये, देशी दारूचे एकूण ३० बॉक्स किंमत २ लाख १० हजार रुपये व एक एक्स यु वी ५०० महिंद्रा कंपनीचे चार चाकी वाहन क्रमांक एम एच ४९ ए ५९२५ किंमत अंदाजे ५ लाख रुपये असा एकूण ९ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल कारवाई करून जप्त केला आहे. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने चामोर्शी पोलिस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून आरोपी गोलू मंडल रा. कुनघाडा रै, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली व अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हे आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून यापूर्वीही त्यांच्यावर विविध पोलिस स्शनटे येथे गुन्हे दाखल आहेत.ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, चामोर्शी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अमुल कादबाने, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक भगतसिंग दुलत, चामोर्शी पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अंमलदारांनी पार पाडली.