ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ३ : द मीडिया फाउंडेशनतर्फे National Awards for Excellence in Journalism राष्ट्रीय पत्रकारिता उत्कृष्टता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन २ एप्रिल २०२५ रोजी स्थानिक हॉटेल लँडमार्क येथे करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गौरवगीताने झाली. माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान तसेच डॉक्टरेट पदवी मिळविल्याबद्दल माजी खासदार डॉ. अशोक नेते यांचा गौरव चिन्ह, शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, अभियंता साखरवाडे, जयंत चौधरी, त्रिपाठी, द मिडिया फाउंडेशनचे संस्थापक ब्रह्मानंद तिवारी, मानवाधिकार संघटनेचे प्रवक्ता ज्ञानेंद्र विश्वास, भाजप जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी खासदार डॉ. अशोक नेते म्हणाले की,पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून सामाजिक, राजकीय व शैक्षणिक घडामोडींचे सत्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. निष्पक्आणि सत्यनिष्ठ पत्रकारितेचा आदर्श ठेवणे गरजेचे आहे. यासोबतच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या उल्लेखनीय व्यक्तींचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला.अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल या कार्यक्रमाला धन्यवाद देतोय, असेही ते म्हणाले. कार्यक्रमात पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पत्रकारांना गौरवचिन्ह व पुरस्कार प्रदान करण्यात आले. पत्रकारितेच्या सत्यशोधन, निष्पक्ष दृष्टिकोन व समाजहिताच्या भूमिकेवर भर देण्यात आला. या सोहळ्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचासुद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पत्रकारितेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर चर्चा झाली आणि उत्कृष्ट पत्रकारितेसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. संपूर्ण कार्यक्रम उत्साह, सन्मान आणि अभिमान यांचे प्रतीक ठरला.











