ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १६ : लाॅईड्स मेटल्स अॅंड एनर्जी लिमीटेड तसेच लाॅईड्स इन्फिनिटी फाउंडेशनने ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास आणि समुदाय सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत हेडरी गावात मार्केट यार्डची निर्मिती केली आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या या मार्केट यार्डचे उद्घाटन नुकतेच पार पडले. या उद्घाटन सोहळ्याला स्थानिक मान्यवर, शासकीय अधिकारी, पोलिस प्रशासन आणि एलएमईएल कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हे नवीन मार्केट यार्ड गावातील स्थानिक विक्रेत्यांसाठी खास विकसित करण्यात आले असून पूर्वी उघड्यावर किंवा तात्पुरत्या जागांवर व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही एक मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. आता विक्रेत्यांना स्वच्छ, संरचित व सुसज्ज मार्केट उपलब्ध झाले असून यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल आणि जीवनमान उंचावेल. ग्रामस्थांसाठीही ही सोय आता दररोजच्या खरेदीसाठी एक उत्तम सुविधा ठरणार आहे. या कार्यक्रमात पुरसलगोंदी ग्रामपंचायतीच्या सरपंच अरुणा सडमेक, उपसरपंच राकेश कवडो, पोलिस पाटील सौरभ कवडो, ग्रामपंचायत सदस्य मधुकर सडमेक, भूमिया लालसाय तालांडे, माजी उपसरपंच काटिया तेलामी, शेजारील गावांतील पाटील गोसु हिचामी (मंगेर), संजय जेट्टी (इत्तुलनार), दिनेश पुंगाटी (आलेंगा), प्रवीण आलम (पुसुमपल्ली) व तुकाराम हिचामी (गोडेली) उपस्थित होते. तसेच हेडरी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक पद्मसिंह दुलात, श्री. देशमुख, श्री. सूर्यवंशी, श्री. नारायण हे अधिकारी उपस्थित होते. कंपनीकडून सुभाशीष बोस (उपाध्यक्ष – खाण संचालन), जीवन हेडाऊ (महाव्यवस्थापक), गणेश सेठी (वरिष्ठ महाव्यवस्थापक – मानव संसाधन) व प्रशांत नामेवार यांच्या नेतृत्वाखालील लायझन टीम उपस्थित होती. सरपंच अरुणा सडमेक व सौरभ कवडो यांनी ग्रामीण भागात पायाभूत सुविधा व उपजीविकेसाठी CSR टीमच्या प्रयत्नांचे कौतुक केले. मार्केट यार्डचे औपचारिक हस्तांतरण पत्र ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आले. दिलीप बुराडे (उपमहाव्यवस्थापक – CSR, LIF) यांनी गावकऱ्यांना आवाहन केले की, आता या मार्केट यार्डचा योग्य वापर आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी लोकांची आहे. हेडरी मार्केट यार्ड हे स्थानिक व्यापार सशक्तीकरणाचे प्रतीक ठरले असून स्थानिक स्वावलंबनासाठी एक मजबूत पायरी आहे. ग्रामपंचायत व कंपनीच्या संयुक्त प्रयत्नातून ग्रामीण जीवनात बदल घडवणारा एक प्रेरणादायी प्रकल्प असल्याचे मत कंपनीने व्यक्त केले आहे.











