भाडेकरूनेच केला ‘त्या’ सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्याचा खून

2449

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १८ : शहरातील सेवानिवृत्त अधिकारी कल्पना केशव उंदीरवाडे यांचा १३ एप्रिल २०२५ लरोजी भर दिवसा खुन झाल्याने पोलिस दलापुढे आरोपीला शोधण्याचे आव्हान निर्माण झाले होते. मात्र या खुनाचे रहस्य उलडगण्यात पोलिसांना यश आले असून खुनी कल्पना उंदीरवाडे यांच्या घरातील भाडेकरूच असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. विशाल ईश्वर वाळके (वय ४०) रा. एटापल्ली, जि. गडचिरोली, असे आरोपीचे नाव आहे.

सविस्तर वृत्तानुसार १३ एप्रिल रोजी दुपारी १२ ते २.३० वाजताच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपीने कोणत्यातरी साधनाने निवृत्त महिला अधिकारी कल्पना केशव उंदीरवाडे ( वय ६४) रा. कल्पना विहार, सुयोगनगर, बोरकर पेट्रोलपंपच्या मागे, नवेगाव ता. व जि. गडचिरोली यांना त्यांच्या राहते घरी डोक्यावर मारून ठार केल्याची घटना घडली होती. त्यानुषंगाने गडचिरोली पोलिस स्टेशन येथे अज्ञात आरोपीविरुद्ध मृत महिलेचे भाऊ श्रेणी पोलिस उपनिरीक्षक मोहन सोनकुसरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यातील अनोळखी आरोपीने कोणत्याही स्वरूपाचा पुरावा अथवा दुवा मागे सोडलेला नसल्याने या गुन्ह्यातील अनोळखी आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करणे हे गडचिरोली पोलीसांपुढे मोठे आव्हान होते. हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर पोलिस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनात हा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस अटक करण्याकरिता उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप यांच्या नेतृत्वात पोलिस स्टेशन गडचिरोली व स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील अधिकारी व अंमलदारांची तीन तपास पथके तयार करण्यात आली होती. यानंतर तपास पथकांनी साक्षीदार तसेच इतर पुराव्यांच्या मदतीने संशयीत विशाल ईश्वर वाळके याला तपासाकरिता ताब्यात घेतले. त्याची गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने विशाल ईश्वर वाळके याला या गुन्ह्यामध्ये शुक्रवार (ता.१८) अटक करण्यात आली. आरोपी विशाल वाळके हा मृत महिला कल्पना उंदीरवाडे यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होता. त्याच्यावर असलेल्या कर्जामूळे व उसनवारीच्या पैशांमूळे चोरी करण्याच्या उद्देशाने तो घरमालक कल्पना उंदीरवाडे यांच्या घरात घुसला. त्यावेळी त्याने कल्पना उंदीरवाडे यांच्या डोक्यावर शस्त्राने वार करून खून केल्याचे व त्यानंतर त्यांच्या अंगावरील दागिणे घेऊन तेथून पळून गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. मात्र गडचिरोली पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपीस मोठ्या शिताफिने अटक केली आहे. या गुन्ह्यात कोणतेही पुरावे नसताना केवळ तांत्रिक पुराव्याच्या मदतीने आणि गोपनीय माहितीच्या आधारावर आरोपीस टक करून अत्यंत गंभीर व क्लिष्ट स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणण्यास गडचिरोली पोलिस दलास यश आले आहे. आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कोर्ट गडचिरोली यांच्या समक्षहजर केले असता न्यायालयाने त्याला २२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजूडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, सहायक पोलिस निरीक्षक भगतसिंग दुलत, सहायक पोलिस निरीक्षक राहूल आव्हाड, सहायक पोलिस निरीक्षक विजय चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक दीपक चव्हाण, महिला पोलिस उपनिरीक्षक विशाखा म्हेत्रे व अंमलदारांनी पार पाडली.

—————————————