ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता . २९ : जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे अंडाशयाच्या (ओव्हेरियन ट्युमर) २ अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या असून, जिल्हा रुग्णालयाने पुन्हा एकदा उच्च दर्जाच्या आरोग्यसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. मा. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सरसह गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाला यामुळे मोठे यश मिळाले आहे.
६५ वर्षीय महिलेवरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या ६५ वर्षीय महिलेच्या पोटात अंडाशयाची मोठी गाठ असल्याचे निदान झाले होते. रुग्णाचे वय आणि गाठीची जटिलता लक्षात घेता ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक मानली जात होती.
जिल्हा शल्य चिकित्सक तथा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वर्षा लहाडे यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. यामध्ये डॉ. आकाश, डॉ. शरद आणि डॉ. मानसी यांनी सहकार्य केले. भूलतज्ज्ञ डॉ. मित्तल व डॉ. सुकेशनी यांनी भूल व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली. ऑपरेशन थिएटर इन्चार्ज माधुरी गेडाम व किरण सिस्टर यांचेही महत्त्वपूर्ण योगदान राहिले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून ती वेगाने सुधारत आहे.
२६ वर्षीय तरुणीच्या दुर्मिळ कॅन्सरयुक्त गाठीवर यशस्वी मात
ग्रामीण रुग्णालय धानोरा येथून संदर्भित करण्यात आलेल्या २६ वर्षीय तरुणीच्या उजव्या अंडाशयात मोठी घन व द्रवरूप मिश्रित गाठ आढळून आली होती. रुग्णाला तीव्र पोटदुखीचा त्रास होत होता आणि गाठीचा आकार सुमारे २४ आठवड्यांच्या गर्भावस्थेइतका मोठा होता.
सीटी स्कॅन आणि सोनोग्राफी तपासणीनंतर वैद्यकीय पथकाने तातडीने ‘एक्स्प्लोरेटरी लॅप्रोटोमी’ करून उजवे अंडाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. ही शस्त्रक्रिया मुख्य शल्यचिकित्सक डॉ. मयुर दुधे, प्रथम सहाय्यक डॉ. कृणाल चेंदकापुरे, द्वितीय सहाय्यक एस/एन सुमेध कांबळे, तृतीय सहाय्यक एस/एन प्रियांका मडावी आणि भूलतज्ज्ञ डॉ. अंकिता भावते यांच्या पथकाने पार पाडली.
शस्त्रक्रियेनंतरच्या तपासणी अहवालात गाठ ही दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर असलेली ‘मिक्स्ड जर्म सेल ट्युमर’ असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये ९० टक्के ‘योल्क सॅक ट्युमर’ आणि १० टक्के ‘एम्ब्रायोनल सेल कार्सिनोमा’ आढळून आले. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे ही कॅन्सरयुक्त गाठ वेळेत पूर्णपणे काढून टाकण्यात यश आले आणि रुग्णाचे प्राण वाचले.
जिल्ह्यातच उपलब्ध होत आहेत अत्याधुनिक उपचार
कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया आता जिल्हा सामान्य रुग्णालयात होत असल्याने गडचिरोलीसह परिसरातील गरीब व गरजू रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. खासगी रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्च येणाऱ्या या शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली मोफत व यशस्वीरीत्या केल्या जात आहेत.
या दोन्ही शस्त्रक्रियांच्या यशस्वीतेमुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे तसेच डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण पथकाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.










