Home Gadchiroli न्यायासाठी लढणाऱ्या अन्नदात्यांना उघड्या आकाशाखाली रात्र; आंदोलनस्थळीच शेतकरी कुटुंबांचा मुक्काम

न्यायासाठी लढणाऱ्या अन्नदात्यांना उघड्या आकाशाखाली रात्र; आंदोलनस्थळीच शेतकरी कुटुंबांचा मुक्काम

39

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ४ : भूमी अधिग्रहण आणि प्रस्तावित विमानतळ प्रकल्पाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या शेकडो शेतकरी कुटुंबांना गुरुवारी रात्री उघड्या आकाशाखाली मुक्काम करावा लागला. दिवसभर आंदोलन करूनही मागण्यांबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळीच रात्र काढण्याचा निर्णय घेतला.

आंदोलनस्थळी रात्रीचे हृदयस्पर्शी चित्र पाहायला मिळाले. गावखेड्यांतून बैलगाड्या, जनावरे आणि आवश्यक संसारोपयोगी साहित्य घेऊन आलेले शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांनी खुल्या मैदानात चटया अंथरून मुक्काम केला. महिला, पुरुष आणि लहान मुले झाडांच्या सावलीत, बैलगाड्यांच्या शेजारी आणि मैदानात विश्रांती घेताना दिसून आली.

विशेष म्हणजे, आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांनाही सोबत आणले असून बैल आणि बैलगाड्यांसह आंदोलनस्थळीच ठाण मांडले आहे. दिवसभराच्या संघर्षानंतर रात्रीच्या अंधारात मैदानात झोपलेल्या शेतकरी कुटुंबांचे दृश्य उपस्थित नागरिकांच्या मनाला चटका लावणारे ठरले.

“देशाच्या जनतेला अन्न पुरवणाऱ्या शेतकऱ्यालाच आज स्वतःच्या जमिनी वाचवण्यासाठी घरदार सोडून रस्त्यावर उतरावे लागले आहे,” अशी भावना अनेक आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. न्यायाच्या अपेक्षेने आलेल्या शेतकऱ्यांना मूलभूत सुविधांशिवाय उघड्या मैदानात रात्र काढावी लागत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

भूमी अधिग्रहण प्रक्रियेला विरोध करत हजारो शेतकरी आज सकाळी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आहेत. शासनाकडून समाधानकारक निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

अंधारात, उघड्या आकाशाखाली आपल्या कुटुंबीयांसह रात्र काढणाऱ्या बळीराजाचे हे चित्र सध्या गडचिरोली जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले असून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.