ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ५ : दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ भांडणातून पोटच्या मुलानेच आपल्या वयोवृद्ध वडिलांचा लाकडी बल्लीने डोक्यावर व चेहऱ्यावर जबर प्रहार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना मुलचेरा तालुक्यातील लगाम चेक येथे घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळजनक उडाली असून अहेरी पोलिसांनी आरोपी मुलावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, नारायण आशा टेकाम (वय ६१, व्यवसाय- मजुरी, रा. लगाम चेक) असे मृताचे नाव आहे. गुरुवार (ता. ४) रात्री १० ते ११ : ४५ वाजताच्या सुमारास मृत नारायण यांचा मोठा मुलगा आरोपी विजय नारायण टेकाम (वय ४० वर्षे) हा दारूच्या नशेत घरी आला. दारूच्या नशेत त्याने वडिलांशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी विजयने रागाच्या भरात घरात असलेल्या लाकडी बल्लीने (दांड्याने) वडिलांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जबर मारहाण केली. या भीषण हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने नारायण टेकाम यांचा जागीच मृत्यू झाला. या संदर्भात मृताचे भाऊ तुळशीराम आशा टेकाम (वय ६५ वर्षे, रा. लगाम चेक, ता. मुलचेरा) यांनी शुक्रवार (ता. ५) अहेरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून अहेरी पोलिसांनी आरोपी विजय नारायण टेकाम याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अहेरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
——————————————-











