आमदार डाॅ.होळी यांनी बाॅक्सर खेळाडूंशी साधला संवाद

229

गडचिरोली, ता. १५ : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डाॅ. देवराव होळी यांनी १३ मे रोजी संध्याकाळा स्थानिक जिल्हा बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राला सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार डाॅ. होळी यांनी या केंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या खेळाडूंशी मनमोकळा संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. बाॅक्सिंगलाच हिंदी, मराठीत मुष्टीयुद्ध म्हणतात. प्राचीन भारतीय संस्कृतीत या खेळाच्या पाउलखुणा दिसून येतात. कोरोनानंतरच्या काळात सर्वांनाच आरोग्याचे महत्त्व कळले असून उत्तम आरोग्यासाठी खेळ अतिशय महत्त्वाचे आहे. बाॅक्सिंगसारख्या खेळामुळे शारीरिक शक्ती, चपळता वाढतेच त्यासोबतच वेगाने निर्णय घेण्याची क्षमता, जिद्दीने झुंजण्याची क्षमताही विकसित होते. त्यामुळे बाॅक्सिंगसारख्या खेळाचा उपयोग संपूर्ण जीवनात आपले व्यक्तिमत्त्व घडवण्यातही होतो. म्हणून या खेळाकडे फक्त स्पर्धेत चमकण्याचे किंवा पदक मिळवण्याचे साधन म्हणून बघू नका. तर त्याला आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनवून आपल्या आरोग्यासाठी, शारीरिक, मानसिक आणि एकूणच व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयोग करून घ्या, असे आवाहनही आमदार डाॅ. देवराव होळी यांनी केले. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, बाॅक्सिंगचे प्रशिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

———————————–