काँग्रेसची अहेरी विधानसभेची तिकीट देतांना निष्ठावंताना डावलू नये..

182

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दि 10 जुलाई

अहेरी:

आगामी विधानसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्राची काँग्रेस पक्षाची उमेदवारी ही निष्ठावंत कार्यकर्त्यांना द्यावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मुश्ता क हकीम यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निवेदनाद्वारे केली आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीत निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्याना डावलून नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यास निष्ठावंतांवर होणारा हा अन्याय असेल असे त्यांनी म्हटले आहे.

सत्ता असो की नसो काँग्रेस पक्षाचे काम तन-मन-धनाने केलेल्या माजी आमदार व गडचिरोली जिल्हा परिषदेचे प्रथम अध्यक्ष पेंटा रामा तलांडी यांना येत्या विधानसभेत अहेरी क्षेत्रातून काँग्रेसची उमेदवारी द्यावी अशी मागणी हकीम यांनी केली आहे.

अहेरी विधानसभा क्षेत्रातून कित्येक वर्षापासून काँग्रेसचे काम त्यांनी इमाने इतबारे केलेल्या असून पक्षाशी ते एकनिष्ठ आहेत .पक्षविरोधी कोणतेही त्यांनी काम केलेले नाही. त्यासोबतच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही त्यांनी कार्यकर्त्यांसोबत सहभाग घेतला होता तलांडी हे 1977 पासून काँग्रेसशी जोडलेले असून काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांचाच विधानसभेसाठी उमेदवारी देताना विचार व्हावा त्यांना डावलल्यास निष्ठावंतावर मोठा अन्याय होईल असा इशाराही मुस्ताक हकीम यांनी निवेदनातून दिला आहे.

अहेरी येथे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर नामदेव कीरसान यांच्या सत्कार समारंभा प्रसंगी आलापल्लीत व अहेरीत स्मार्ट विद्युत मीटर विरोधात लागलेल्या होर्डिंग मध्ये भावी आमदार म्हणून पेंटा रामा तलांडी यांचा उल्लेख होता.

अहेरी येथील गांधी चौकात खासदारांच्या जाहीर सत्कार कार्यक्रमात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या वेळी लोकसभेत काँग्रेसच्या उमेदवाराला पहिली विधानसभा क्षेत्रातील जनतेने आशीर्वाद दिला तसाच भरघोस आशीर्वाद येत्या विधानसभा निवडणुकीत” हनुमंताला”” द्या असे जनतेला आवाहन केले होते व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा सुचक इशारा दिला होता.त्यासोबत भावी आमदार म्हणून होर्डिंग लावणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी कान पिचक्या दिल्या होत्या.

त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार हे रंजकच ठरणार आहे.आतापासूनच आपल्याच नेत्यांला उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेस कार्यकर्ते फिल्डिंग लावताना दिसत आहेत.