दोन जहाल माओवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

95

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. २० : जिल्हा पोलिस विभाग व केंद्रीय राखिव पोलिस दलापुढे दोन जहाल माओवाद्यांनी शुक्रवार (ता. २०) आत्मसमर्पण केले. रामसू दुर्गू पोयाम ऊर्फ नरसिंग (ए.सी.एम) (वय ५५), रा. गट्टानेली, ता. धानोरा, जि. गडचिरोली व रमेश शामू कुंजाम ऊर्फ गोविंद ऊर्फ रोहित (दलम सदस्य) (वय २५)रा. वेडमेट्टा, जि. नारायणपूर (छत्तीसगड) अशी आत्मसमर्पित माओवाद्यांची नावे आहेत.

रामसू पोयाम ऊर्फ नरसिंग १९९२ मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन १९९५पर्यंत कार्यरत होता. १९९५ मध्ये काकुर दलममध्ये राहून सन १९९६ पर्यंत माओवाद्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना सुरक्षा देण्याचे काम करत होता. सन १९९६ ते १९९८ पर्यंत पुन्हा टिपागड दलममध्ये कार्यरत होता. सन १९९८ मध्ये माड एरीया (छत्तीसगड) येथे बदली होऊन सप्लाय टिममध्ये सन २००१ पर्यंत कार्यरत होता. २००१ ते २००२ पर्यंत प्रेस टिममध्ये प्रशिक्षणाकरिता कार्यरत होता. २००२ मध्ये एरीया कमिटी मेंबर (एसीएम) पदावर पदोन्नती होऊन माआवाद्यांसाठी कृषी कामाकरिता कोडतामर्का गाव परीसरात सन २००५ पर्यंत कार्यरत होता. २००५ ते २०१० या कालावधीत डुमनार, फरसगाव व कोडेनार या गावांमध्ये माओवाद्यांसाठी कृषीची कामे करत होता. २०१० ते आजपर्यंत कुतुल आणि नेलनार दलममध्ये एरीया कमिटी मेंबर (एसीएम) पदावर कार्यरत होता. त्याच्यावर आजपर्यंत एकूण १२ गुन्हे दाखल असून त्यामध्ये ६ चकमक, ५ खून, व १ दरोडा या गुन्ह्यांचा समावेश आहे. रमेश कुंजाम ऊर्फ गोविंद ऊर्फ रोहित २०१९ मध्ये मिलिशिया म्हणून माओवाद्यांची कामे करत होता. २०२० मध्ये चेतना नाट्यमंच (सीएनएम) येथे सदस्य पदावर भरती होऊन कार्यरत होता. २०२१मध्ये कुतुल दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपर्यंत कार्यरत होता. हिंसक घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याची पडताळणी करणे सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने रामसू दुर्गू पोयाम ऊर्फ नरसिंग याच्यावर ६ लाख रुपयांचे, तर रमेश शामू कुंजाम ऊर्फ गोविंद ऊर्फ रोहित याच्यावर २ लाख रुपयाचे बक्षिस जाहीर केले होते. आत्मसमर्पणानंतर दोघांनाही प्रत्येकी ४.५ लाखांचे बक्षिस जाहीर केले आहे. यावर्षात २० जहाल माओवाद्यांसह २०२२ ते आतापर्यंत एकूण ३३ जहाल माओवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. ही कारवाई विशेष पोलिस महानिरीक्षक ( नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदीप पाटील, पोलिस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र) अंकित गोयल, सीआरपीएफचे पोलिस उपमहानिरीक्षक (अभियान) अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफच्या ३७ बटालियनचे प्रभारी समादेशक सुजीत कुमार यांच्या मार्गदर्शनात पार पडली. यावेळी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­ऱ्या माओवाद्यांवर पोलिस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्वीकारावा. शासनाने सन २००५ पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण ६८० माओवाद्यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.

—————————————