नागपूर नागरिक सहकारी बँकेचा ६ व्या वर्धापनदिनी गीता हिंगे यांना समाजमित्र सन्मान

50

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १४ : नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या गडचिरोली शाखेने आपल्या ६ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून समाजमित्र सन्मान सोहळ्याचे तसेच कार लोन मेळाव्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्षा गीता हिंगे यांचा समाजमित्र म्हणून सन्मान करण्यात आला.

नागपूर नागरिक सहकारी बँक बँकिंग व्यवसायसोबतच आपल्या सामाजिक दायित्वचा प्रत्यय देत आली आहे. ज्याद्वारे रक्तदान शिबिर, निशुल्क नेत्र तपासणी व चष्मे वाटप इत्यादी उपक्रम राबवत आली आहे. या ६ व्या वर्धापनदिनी सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ कार्य करणाऱ्या विभूतींचा सन्मान सोहळा आयोजित केला गेला. यात सोहळ्यात आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष गीता हिंगे ज्यांनी आधारविश्व फाउंडेशन ही महिलांची संघटना स्थापन करून मोठ्या प्रमाणात महिलांचे एकत्रीकरण करुन अनेक समाजोपयोगी उपक्रम आधारविश्व फाउंडेशनच्या माध्यमातून राबवित असतात. जसे विधवांना समाजात सन्मान मिळावा म्हणून दरवर्षी मकर संक्रांतीला विधवांसोबत हळदीकुंकूचा कार्यक्रम घेणे, प्लास्टिक प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जलप्रदूषण याविषयी जनजागृती, आदिवासी नक्षलग्रस्त भागात जाऊन गरजूंना मदत, कोरोना काळात बेवारस मृतदेहाचे अंतिम संस्कार करून तसेच कोरोनाबधितांना स्वखर्चाने टिफिन सुविधा उपलब्ध करून दिली. त्याच बरोबर महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाच्या कार्यातही त्या अग्रेसर आहेत. याशिवाय श्री सत्य साई सेवा संघटनेच्या माध्यमातून समाजसेवा करणारे डॉ. चंद्रकांत लेनगुरे, भूषण समर्थ, सतीश आदमने, वनहक्काचा लढा देणारे देवाजी तोफा, डॉ. हेमंत अप्पलवार ज्यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम ठिकाणी सर्वप्रथम नेत्ररोग सुविधा उपलब्ध करून दिली त्याच बरोबर सुरवातीच्या काळात दुर्गम भागातही आपली सेवा दिली, डॉ. शिवनाथ कुंभारे श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि तुकारामदादांच्या प्रेरणेने रुग्णसेवेतून कित्येकदा माणुसकीचा परिचय देत आले आहेत. तसेच प्रा. सविता सादमवार, जय मेश्राम,प्रसाद पवार यांचाही सत्कार करण्यात आला.

————-