माओवाद्यांनी गोळी झाडून केली एकाची हत्या; गडचिरोलीत खळबळ

127

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली: माओवाद्यांनी एकाची गोळी झाडून हत्या केल्याची घटना शुक्रवारी (26 जुलै) रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. जयराम कोमटी गावडे (40) रा. आरेवाडा, तालुका भामरागड असे त्याचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार जयराम कोमटी गावडे आणि त्याची पत्नी नक्षल चळवळीत सामील होते. मागील सात-आठ वर्षापूर्वी दोघांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. दोघेही भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथेच आपली शेती, मोलमजुरी करत उदरनिर्वाह करायचे. 25 जुलै रोजी माओवाद्यांनी आरेवाडा येथे त्याची गोळी झाडून हत्या केली. ही घटना 26 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आल्यावर एकच खडबड उडाली आहे.नुकतेच 17 जुलै रोजी गडचिरोली पोलिसांच्या सी-60 पथकाने एटापल्ली तालुक्यातील जारावंडी लगत छत्तीसगड सीमेवरील वांडोली जंगल परिसरात 12 माओवाद्यांना कंठस्नान घातले होते. यात मोठ्या कॅडरच्या माओवाद्यांचा समावेश होता. या घटनेला 10 दिवस उलटले नाही तर माओवाद्यांनी भामरागड तालुक्यात आत्मसमर्पित माओवाद्याची हत्या केली.विशेष म्हणजे 28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान माओवादी शहीद सप्ताह पाळतात. यादरम्यान सरकारी मालमत्तेचे नुकसान, सुरक्षा दलावर हल्ले, खबरी असल्याच्या संशयावरून हत्या, रस्ते बंद करणे अश्या घटना घडतात. मात्र, सप्ताहाच्या पूर्वीच अमरगड तालुका मुख्यालय पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आरेवाडा येथे जयराम कोमटी गावडे नामक आत्मसमर्पित माओवाद्याची हत्या करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे.