गडचिरोली पोलिस दलाने अतिदुर्गम गर्देवाड्यात साजरा केला रक्षाबंधनाचा सण

79

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली,ता. १९ : जिल्ह्यातील माओवादग्रस्त व अतिदुर्गम, आदिवासीबहुल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेडरी पोलिस मदत केंद्रातील गर्देवाडा येथे पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख व अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांनी भेट देत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी गर्देवाडा येथील महिला पोलिस अंमलदार व भगवंतराव आश्रमशाळेतील येथील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाच्या उपक्रमात सहभाग घेऊन सर्व पोलिस अधिकारी व अंमलदारांना राखी बांधली.

यावेळी कार्यक्रमास गावातील ८० ते १०० महिला पुरुष व ६० ते ७० शालेय विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित सर्वांना मान्यवरांच्या हस्ते विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी शुभेच्छा देताना म्हटले की, गडचिरोली पोलिस दलात दुर्गम-अतिदुर्गम भागात पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्र स्तरावर महिला पोलिस अंमलदार या पोलिस स्टेशनची सुरक्षा व माओवादविरोधी अभियानामध्ये अग्रभागी आहेत. अनेकवेळा कर्तव्यामुळे हा सण त्यांना पोलिस स्टेशन येथेच साजरा करावा लागतो. त्यांना कुटुंबात सहभागी होता येत नाही. कर्तव्याला प्रथम प्राधान्य देणाऱ्या या महिला पोलिस अंमलदारांसोबत हा रक्षाबंधनाचा सण आज आम्हास साजरा करता आला. तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या व उपस्थित सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच खडतर सेवा देणारे सी-६० चे जवान अतिसंवेदनशील भागात सेवा देत असताना आपल्या कुटुंबियांसोबत रक्षाबंधन सण साजरा करू शकत नाहीत. त्यामुळे सी-६० च्या अधिकारी व अंमलदार यांना फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोलीच्या विद्यार्थिनींनी व प्रा. प्रज्ञा वनमाळी यांनी विशेष अभियान पथक कार्यालय, गडचिरोली येथे राखी बांधुन रक्षाबंधन सण साजरा केला. तसेच जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्र येथे रक्षाबंधनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्यासह सीआरपीएफ एटापल्लीचे उप-कमांण्डंट राजीव सिंग व असिस्टंट कमांडन्ट विक्रम साकेत सोबतच गर्देवाडा पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक शिंदे तसेच इतर पोलिस अधिकारी व अंमलदार आणि शाळेतील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.