लोकसभेतील राग विधानसभेत निघेलच असे नाही : राज ठाकरे

25

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २२ : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेत लोकांनी विरोधी पक्षांना जे मतदान केले ते सत्ताधारी सरकारवरच्या रागापोटी केले. त्यावेळेस जे एकगठ्ठा मतदान झाले ते विधानसभेतही होईलच असे नाही. विधानसभेतील राजकीय समिकरणे बदललेली असतील. म्हणून कुणीही भ्रमात राहू नये, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे २२ आॅगस्ट रोजी गडचिरोली येथे म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असून गडचिरोली येथे आले असता त्यांनी सर्किट हाऊस विश्रामगृहात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते. राज ठाकरे पुढे म्हणाले की, मनसेच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भातील इतर विधानसभेसाठी उमेदवार उभे करण्यात येतील. पण उमेदवारी मिळत नाही म्हणून इतर पक्षातून तिकिट मागायला येणारे घेणार नाही. आपल्या पक्षातील लोकांचाच विचार करीन. गडचिरोली जिल्ह्यात अनेक उर्जावान नवतरुण आहेत. त्यांना संधी देण्याची गरज आहे. सध्या लाडकी बहिण योजना सुरू आहे. मी यापूर्वीही या योजनेवर बोललो आहे. लोकं अशा योजनांनी फसत नाहीत. ते पैसे नक्की घेतात. पण मत ज्यांना द्यायचे त्यांनाच देतात. सध्या राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. अशा घटना घडू नयेत यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे. सध्या राजकारण इतके विचित्र झाले आहे की, कोण कुठल्या पक्षात आहे हेच कळायला मार्ग नाही. हे सगळे बदलायला हवे, असेही ते म्हणाले. यावेळी काही जणांनी त्यांना जिल्ह्यातील पक्ष संघटन खिळखिळे झाल्याचीही माहिती दिली. तेव्हा आपण संबंधित पदाधिकारी यांना बोलवून झाडाझडती घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. शिवाय आपण जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीदरम्यान पुन्हा येणार असून जाहीर सभेतून जनतेशी संवाद साधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

–l