जहाल माओवादी केदार ऊर्फ मन्या किंजो नैतामने केले आत्मसमर्पण

28

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. ३० : माओवाद्यांच्या टेक्निकल टीम- वेस्ट सब झोनल ब्युरोचा एरिया कमिटी सदस्य केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम ( वय ४२) रा. कोसमी नं. – १ ता. धानोरा, जि. गडचिरोली याने शुक्रवार ३० आॅगस्टला गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले. केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम २००२ ते २००७ पर्यंत टिपागड दलम मध्ये सदस्य पदावर कार्यरत होता. २००७ ते २०१२ टेकनिकल टिम नॉर्थ गडचिरोली डिव्हीजनमध्ये कार्यरत होता, २०१२ ते २०२० पर्यंत प्लाटून १५ (टिपागड एरिया) होता. त्यानंतर २०२० मध्ये एरिया कमिटी सदस्य पदावर त्याची बढती झाली तेव्हापासुन आतापर्यंत टेक्निकल टिम-वेस्ट सब झोनल ब्युरो येथे कार्यरत होता. त्याचा पोलिसांसोबत झालेल्या एकूण १८ चकमकीत सहभाग होता. २००४ मध्ये मौजा मानेवारा व मौजा बंदुर अशा दोन जंगल परिसरात पोलिस दलासोबत झालेली चकमक, २०१४ मध्येच मौजा बोटेझरी जंगल परीसरातील चकमक, सन २०१६ मध्ये मौजा दराची जंगल परिसरातील चकमक, सन- २०१९ मध्ये मौजा गांगीन जंगल परिसरातील चकमक, सन-२०२० मध्ये मौजा किसनेली जंगल परिसरातील चकमक, सन- २०२१ मध्ये मौजा कोडूर (माड एरीया) (छत्तीसगड)जंगल परिसरात पोलिस दलासोबत झालेल्या चकमकीमध्येही त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. त्याच्यावर २ जाळपोळ, ८ खुन प्रकरणे व इतर ६ असे एकूण ३४ गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर ६ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता केंद्र व राज्य शासनाकडून केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम याला एकूण ४.५ लाख रुपये बक्षिस जाहीर केले आहे. या माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्य प्रवाहात आणण्याबाबतची कार्यवाही विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपुर संदीप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलिस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफच्या ११३ बटालियनचे कमांडंट जसवीर सिंग यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक विश्वंभर कराळे, सावरगाव पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी यांनी पार पाडली. विशेष म्हणजे २००५ पासून आजपर्यंत एकूण ६७३ माओवाद्यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलिस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा, असे आवाहन यावेळी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे. ———–