ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ४ : छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमेवर झालेल्या चकमकीत एका जहाल नेत्यासह नऊ माओवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले आहे. यात पाच महिला माओवाद्यांचा समावेश आहे. ठार झालेल्या माओवाद्यांवर एकूण ६० लाखांपेक्षा अधिक बक्षीस होते, अशी माहिती बस्तर क्षेत्राचे महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली
या पत्रकार परीषदेत महानिरीक्षक सुंदरराज पी म्हणाले की, मंगळवार (ता. ३) छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमा भागांतील लोहगाव, पुरंगेल, एन्ड्री जंगल परीसरात सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास जिल्हा राखीव दल (डीआरजी) आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाकडून (सीआरपीएफ) संयुक्तपणे माओवादविरोधी अभियान रबविण्यात आले. हे अभियान राबवत असताना दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. सात तास चाललेल्या या चकमकीत ९ माओवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आहे. यात वारंगल येथील रहिवासी माओवाद्यांच्या दंडकारण्य विशेष झोनल समितीचा सदस्य रणधीरचादेखील मृत्यू झाला. त्याच्यावर ३० लाखांपेक्षा अधिक बक्षीस होते. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत चकमक सुरू होती व परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी घटनास्थळावरून एसएलआर, ३०३ आणि १२ बोअरची हत्यारे तसेच मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. या वर्षभरात छत्तीसगडमध्ये झालेल्या पोलिस-नक्षल चकमकीत तब्बल १५३ माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे, तर ६६९ माओवाद्यांना अटक करण्यात आली असून ६५६ जणांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये अनेक मोठ्या माओवादी नेत्यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे छत्तीसगड राज्यातील माओवादी चळवळही खिळखिळी झाल्याचा दावा छत्तीसगड पोलिसांनी केला आहे.