शौचास जाणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्यास तीन महिन्यांचा तुरूंगवास

99

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १३: गावाबाहेर शौचास जात असलेल्या महिलेचा पाठलाग करून तिला रस्त्यावर अडवून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अहेरी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ३ महिन्यांचा तुरुंगवास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा शुक्रवार १३ सप्टेंबर रोजी सुनावली आहे.

जगन्नाथ शिवकुमार बैरागी (वय ३६), ता. एटापल्ली असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार २४ ऑक्टोबर २०१७ रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास पीडित महिला गावाबाहेर शौचास जात असताना आरोपी जगन्नाथ बैरागी तिच्या मागे गेला. जगन्नाथ आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच महिला माघारी फिरली. मात्र, जगन्नाथने तिला रस्त्यात अडवून तिचे तोंड दाबून विनयभंग केला. पीडित महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी जगन्नाथ बैरागी याच्यावर भादंवि कलम ३४१, ३५४ तसेच अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. एटापल्लीचे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत भोसले यांनी तपास पूर्ण केल्यानंतर अहेरी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. शुक्रवारी या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एम. बावणकर यांनी साक्षदारांचे बयाण आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी जगन्नाथ बैरागी याला ३ महिन्यांचा तुरूंगवास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील नीळकंठ भांडेकर यांनी काम पाहिले.

—————————–