गडचिरोलीकरांनी सोडला सुटकेचा नि:श्वास, रानटी हत्ती चंद्रपूर जिल्ह्यात

103
  1. ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. १ : गडचिरोली शहरातील सेमान देवस्थान व वाकडी परीसरात फिरत असलेले रानटी हत्ती सोमवारी रात्री वैनगंगा नदी पार करून चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाल्याने गडचिरोलीकरांनी सोडला सुटकेचा नि:श्वास आहे.

रानटी हत्तींच्या एका कळपाने शनिवारी रात्री कठानी नदी पार करून खरपुंडी परीसरात प्रवेश केला. येथून सालईटोला, माडेतुकूम, बोदली, मसेली अशी गावे पार करत हे हत्ती गडचिरोली शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सेमाना हनुमान देवस्थान व वाकडी गावातील परीसरात भटकत होते. येथील धानपिकावर ताव मारून सोमवारी हत्तींनी मुडझा, पुलखल परीसराकडे मोर्चा वळवला. रात्री ८. ३० वाजताच्या दरम्यान वायुनंदना वीज निर्मिती प्रकल्पाच्या परीसरातून हत्तींनी वैनगंगा नदी पार केली.जवळपास २८ ते ३० रानटी हत्तींचा हा कळप असून हे हत्ती वैनगंगा नदीच्या पलिकडच्या काठावरील चंद्रपूर जिल्ह्यातील वाघोली गावाच्या परीसरात पोहोचले आहेत. आता हे रानटी हत्ती चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी भटकतील की पुन्हा गडचिरोली जिल्ह्यातच परत येतील, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. वनविभाग ड्रोन कॅमेराद्वारे हत्तींवर लक्ष ठेवून आहे. विशेष म्हणजे हत्तींच्या कळपाने यापूर्वीही आरमोरी, देसाईगंज तालुक्याच्या परीसरातून वैनगंगा नदी पार करून चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश केला होता. पण रणमोचन गावाजवळ फटाके फोडून, टायर जाळून ग्रामस्थांनी हत्तींना पळवून लावले होते. त्यामुळे हत्ती रात्रीच पुन्हा वैनगंगा नदी पार करून गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात पोहोचले होते. त्यानंतरही एक नर हत्ती रेकी करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाला होता. मात्र शेतातील विजेच्या स्पर्शाने त्याचा मृत्यू झाला होता. आता गडचिरोली जिल्ह्यातून हा एक कळप चंद्रपूर जिल्ह्यात गेला असला, तरी आणखी काही रानटी हत्ती गडचिरोली जिल्ह्यातच असण्याची शक्यता नाकारता येत नाही.