नागपूर,दि. 16 – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ कलम १२७ नुसार कोणत्याही उमेदवारांनी आपल्या प्रचारासाठी वापरल्या जाणा-या पत्रके, पोस्टर्स, फ्लेक्स आदींच्या छपाईबाबत स्वयंस्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
कोणत्याही व्यक्तीला पत्रके, पोस्टर्सच्या दर्शनी भागावर मुद्रकाचे आणि प्रकाशकाचे नाव, पत्ता व किती प्रती छापल्या याची माहिती टाकणे आवश्यक आहे. नाव नसलेले कोणतेही निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक मुद्रित वा प्रकाशित करता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीला निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक प्रकाशित करताना याबद्दल ती स्वतः त्याचा प्रकाशक आहे याबद्दलचे स्वतः स्वाक्षारित केलेले व त्या व्यक्तीला व्यक्तीशः ओळखतात अशा दोन व्यक्तींनी साक्षांकित केलेले अधिकथन मुद्रकाला दोन प्रतिमध्ये देणे बंधनकारक आहे. पत्रक, पोस्टर, दस्तऐवज मुद्रीत करण्यासाठी वाजवी मुदतीच्या आत मुद्रकाने त्या कागदाच्या एका प्रतिसह अधिकथनाची एक प्रत ही जिल्हा दंडाधिकारी यांना पाठवल्याशिवाय मुद्रित करता येणार नाही किंवा मुद्रीत करता येणार नाही.
कायद्यानुसार कोणतेही कागदपत्र अन्य कोणत्याही माध्यमातून मुद्रित करणे, झेरॅाक्स करणे अशा प्रक्रियांना मुद्रण असल्याचे समजण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक यात उमेदवाराच्या किंवा उमेदवारांच्या एखाद्या गटाच्या निवडणुकीबाबत प्रचालन करण्यासाठी वाटण्यात आलेले कोणतेही मुद्रित पत्रक, हस्तपत्रक, घोषणाफलक, भित्तीफलक आदींचा समावेश अंतर्भूत आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.