ग्लोबल गडचिरोली न्यूज,
चामोर्शी, ता. ८ : तालुक्यातील सोमनपल्ली येथील एका तरुणाने कोंबडा देण्यास नकार दिल्याने त्याला ठार करून जाळून टाकल्याची घटना बुधवार (ता. ६) दुपारी ३.३० वाजता घडली. मनोज आनंदराव मेकर्तीवार ( वय ३२) रा. सोमनपल्ली, असे मृत तरुणाचे नाव आहे, तर सचिन राजेश्वर मेकर्तीवार (वय २८) रा. सोमनपल्ली, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली, राहुल बंडू गुंजेकर (वय ३२) रा. चिंचाळा ता. जि. चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार मनोज मेकर्तीवार, सचिन मेकर्तीवार व राहुल गुंजेकर हे तिघे जण गावात एकत्र येऊन दारुच्या नशेत होते. यावेळी आरोपींनी मृत मनोज मेकर्तीवार याला त्याच्या घरचा कोंबडा मागितला. तो त्याने देण्यास नकार दिल्यामुळे चिडून जाऊन त्याला घराच्या बाजूला ओढत नेऊन मारहाण केली. काही दूरपर्यंत मारत नेल्यामुळे तो मरण पावला हे लक्षात आल्यावर त्याला दोघांनीही येनापूर रस्त्यालगतच्या नाल्याजवळ नेले व गावात जाऊन पेट्रोल आणले आणि त्याचे कपडे काढून त्याच्या अंगावर काड्या व कपडे टाकून जाळून टाकले. त्यामध्ये तो अर्धवट जळाला ही बाब गावकऱ्यांना माहीत झाली व त्यांनी पोलिस पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस स्टेशनला माहिती देताच आष्टी पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा केला व मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. पोलिसांनी लगेच तपासचक्रे फिरवत आरोपींना अटक केली.