ग्लोबल गडचिरोली न्यूज
जिल्हा प्रशासनाचे आवाहन
गडचिरोली, दि. १५ (जिमाका): गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुक्यामधील चिचडोह बॅरेजचे दरवाजे बंद करून पाणीसाठा करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाद्वारे करण्यात आले आहे. त्याकरीता १८ नोव्हेंबर २०२४ पासून सर्व दरवाजे द्वारसंचलन कार्यक्रमानुसार (प्रथम नदी काठावरिल व क्रमाने नदीच्या मध्यभागातील द्वारे) क्रमाने क्रमाने बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे नदी पात्रात उर्ध्व बाजुस व नदीत आलेल्या उपनद्या व नाल्यांमध्ये पाणीसाठा निर्माण होणार आहे आणि नदीतील पाण्याची पातळी वाढणार आहे.
वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस ५ कि.मी. अंतरावर चिचडोह धरणचे बांधकाम जून २०१८ मध्ये पूर्ण झालेले आहे. सदर धरण मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीचे वरचे बाजुस ४ किलोमिटर अंतरावर आहे. धरणाची एकूण लांबी ६९१ मीटर असून १५ मीटर लांबीचे व ९ मीटर उंचीचे ३८ लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आलेले आहेत. धरणात दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ रोजी पाणी पातळी १७५.२० मी. आहे.
वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे जिवित व वित्त हानी होवू नये म्हणून, सर्व लगतचे गावांना/ ग्रामपंचायतींनी आपले गावकऱ्यांना, याबाबत दवंडीद्वारे सुचीत करण्याचे व नदीकाठावरिल शेतांमध्ये कामे करतांना सतर्क राहण्याचे, मासेमारी करणारे व पशुपालक यांनी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून नदी ओलांडू नये, रेती घाटातून रेती काढणारे आणि नदीपात्रात इतर काम करणा-या लोकांनी खबरदारी घेण्याचे तसेच नदी काठावर जाणे टाळण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत.
*या गावांनी आहे धोका* : गडचिरोली जिल्ह्यातील कुरूड, रामपूर, विसापूर, निमगांव, खोर्दा, हिवरगांव, तळोधी मोकासा, कुनघाडा, नवेगांव (रै.), आमगांव माल, दर्शनी माल, येवली, मार्कंडा, घारगांव, फराडा, डोटकुली, डोंगरगांव (बु.), शिवणी, मुडझा (बु.), पुलखल. तसेच चंद्रपुर जिल्ह्यातील हरांबा, कढोली, उमरी, काजळवाही, डोनाळा माल, डोनाळा चक, वढोली गांडली, वढोली चक, पेडगांव, सोनापूर, सामदा, वाघोली बुटी, व्याहाड (बु.), लोंढोली, उसेगांव, कापसी, उपरी.
वाढीव पाणी पातळीमुळे जिवित व वित्त हानी होवू नये म्हणून नदीलगतचे सर्व गावकऱ्यांनी सदर कालावधीत नदीकाठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करतांना उचित सतर्कता बाळगावी. मार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरी, नदीवर आंघोळ करणारे, मासेमारी करणारे, नदीघाटातुन रेती काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेवून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल मोरघडे यांनी केले आहे