माओवाद्यांनी पेरलेल्या दोनपैकी एका स्फोटकाचा झाला स्फोट

88

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

अजून एक आयईडी (I.E.D.)(क्लेमोर) नियंत्रित स्फोटाद्वारे नष्ट करण्यात आला आहे. परिसरात अजून स्फोटके (I.E.D.) आहेत का, याकरिता शोध मोहीम सुरू आहे.

गडचिरोली,ता.१६ : देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गडचिरोली येथील प्रचारसभेच्या पूर्वसंध्येला शनिवार १६ नोव्हेंबर रोजी भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदी पुलावर माओवाद्यांनी पेरून ठेवलेल्या दोन स्फोटकांपैकी एकाचा स्फोट झाला. मात्र यात कुठलीही जिवीतहानी झाली नसून उर्वरीत दुसरे स्फोटक निकामी करून पोलिसांनी माओवाद्यांचा कट उधळला आहे.

प्राप्त माहितीनुसार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर काही स्फोटके (I.E.D)पेरून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्फोटकांचा शोध घेऊन ते निकामी करण्यासाठी गडचिरोलीहून एक बीडीडीएस (बाॅंम्ब शोधक व नाशक पथक) टीम हेलिकॉप्टरने घटनास्थळी पाठविण्यात आली. गडचिरोली पोलिस, सीआरपीएफ कंपनी आणि बीएसएफ कंपनीच्या एकत्रित पथकाने या परीसरात शोध अभियान सुरू केले. शोध अभियाना दरम्यान पथकांना भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर दोन स्फोटके (IED)सापडली. बीडीडीएस पथक स्फोटके निष्क्रिय करण्याची तयारी करत असताना एका स्फोटकाचा (IED)स्फोट झाला, तर दुसरे स्फोटक (IED)बीडीडीएस पथकाने घटनास्थ्ळावर नियंत्रित स्फोटाद्वारे नष्ट केले. यात स्फोटात सुरक्षा दलातील कोणत्याही जवानाला दुखापत झालेली नाही, तसेच या परीसरात अजून शोध अभियान सुरू आहे. गडचिरोली पोलिसांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूक उधळून लावण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. छत्तीसगड सीमेवरील माओवादप्रभावित भामरागड येथे पर्लकोटा नदीजवळ नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. तेथे स्फोट झाल्याची घटना शनिवारी सकाळी उजेडात आली. विधानसभा निवडणुकीसाठी अवघे चार दिवस शिल्लक असताना ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे उद्या रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रचारसभेसाठी गडचिरोलीत येत आहेत. माओवाद्यांनी घातपाताच्या दृष्टीने हा स्फोट घडवून आणल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. या परिसरात सध्या पोलिसांकडून शोध अभियान सुरू आहे. माओवादी अनेकदा जमिनीत स्फोटके पेरून ठेवतात, त्यानंतर स्फोट घडवून आणतात. या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये म्हणून पोलिसांनी परीसर पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथकामार्फत तपासणी केली जात असून या मार्गावर मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तूर्त या मार्गावरील वाहतूक देखील रोखून धरली आहे. विशेष म्हणजे भामरागड हा छत्तीसगडला चिकटून असलेला परिसर आहे. विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्याआधी स्फोट घडवून माओवाद्यांनी सुरक्षा यंत्रणेला एक प्रकारे आव्हानच दिले आहे.

————————————–