१११ वर्षाच्या आजीचे उत्साहात मतदान

55

तरुण मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचे केले आवाहन

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली दि .२०: गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मतदार मोठ्या संख्येत उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत.सकाळी ७ वाजेपासूनच प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. लोकशाहीच्या या उत्सवात तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत येथील १११ वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले.

 

फुलमती बिनोद सरकार (वय १११) असे त्या आजींचे नाव असून त्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी आहेत. फुलमती सरकार यांचा जन्म १ जानेवारी १९१३ रोजी झाला. आजीला चालता येत नसल्याने प्रशासनाने चारचाकी वाहन आणि व्हील चेअरची व्यवस्था केली होती.आजीने प्रत्यक्ष मतदान करत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला. आजींच्या मतदानाचा उत्साह कौतुकास्पद होता. तर मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्या तरुण वर्गासाठी १११ वर्षांच्या आजींचा हा उत्साह आदर्शवत होता.

 

भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षावरील मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती. त्या कालावधीत गृह मतदान प्रक्रिया सुद्धा राबविण्यात आली. मात्र फुलमती सरकार या वृद्ध आजीने मतदान केंद्रावरच जाऊन प्रत्यक्ष मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी आज प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

 

लोकशाहीच्या उत्सवात तब्बल १११ वय असलेल्या या आजींनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन मतदान करणे ही अभिमानास्पद बाब आहे. त्यांनी गृह मतदान नाकारून लोकशाहीच्या उत्सवात प्रत्यक्ष सहभाग घेतला.एवढेच नव्हे, तर तिने आपल्या बांगला भाषेत सर्वांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले हे विशेष.

 

प्रशासनाने शाल-श्रीफळ देऊन केले स्वागत

फुलमती बिनोद सरकार या आजीला प्रशासनाने चारचाकी वाहनातून मतदान केंद्रावर आणले. त्यांनतर शालेय विद्यार्थी,गावकरी तसेच प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पांचा वर्षाव करत मतदान केंद्राच्या आवारात स्वागत केले.त्यांनतर आजीने उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. प्रशासनाच्या वतीने अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी फुलमती बिनोद सरकार यांना शॉल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत स्वागत केले.यावेळी मुलचेराचे गटविकास अधिकारी एल. बी. जुवारे,पुरवठा अधिकारी इंगोले,तलाठी रितेश चिंदमवार, ग्रामपंचायतचे सचिव अक्षय कुळमेथे तसेच आदी कर्मचारी उपस्थित होते.

 

कोरोना काळात लसीकरणातही पुढाकार

फुलमती सरकार यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये देखील गोविंदपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान कले.एवढंच काय तर देशावर कोरोना महामारीचा संकट असताना सुरुवातीला गडचिरोली जिल्ह्यात लसीकरणासाठी नागरिकांचा विरोध होता. या आजींनी लसीकरणातही पुढाकार घेऊन स्वतः लस घेत लसीकरणासाठी सर्वांनी पुढे यावे असंही आवाहन केलं होतं.