जहाल महिला माओवाद्याचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

297

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २ : माओवाद्यांचा सप्ताह प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी सोमवार (ता. २) एका जहाल महिला माओवाद्याने गडचिरोली पोलिस दल व केंद्रीय राखिव पोलिस दलापुढे आत्मसमर्पण केले. सरकारने तिच्यावर एकूण २ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. तारा ऊर्फ शारदा ऊर्फ ज्योती दस्सा कुळमेथे (वय २८) रा. नैनेर, ता. अहेरी, जि. गडचिरोली, असे शरणागत महिला माओवाद्याचे नाव आहे.

सरकारने सन २००५ पासून माओवाद्यांसाठी आत्मसमर्पण योजना जाहीर केली असून आजपर्यंत एकुण ६७९ माओवाद्यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. सोमवारी जहाल महिला माओवादी तारा ऊर्फ शारदा ऊर्फ ज्योती दस्सा कुळमेथे हिने आत्मसमर्पण केले. तारा कुळमेथे सन २०१६ मध्ये अहेरी दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन २०१८ पर्यंत कार्यरत होती. सन २०१८ पासून आजपर्यंत भामरागड दलममध्ये कार्यरत होती. तिचा आजपर्यंत पोलिसांसोबत झालेल्या ८चकमकींमध्ये सहभाग असून सन-२०१६ मध्ये कवठाराम जंगल परिसरात सुरक्षा दलासोबत झालेली चकमक, -२०१७ मध्ये शेडा-किष्टापुर जंगल परीसरातील चकमक, २०१७ मचध्ये आशा-नैनेर जंगल परिसरातील चकमक, २०१९ मध्ये मोरमेट्टा जंगल परीसरातील चकमक, २०२० मध्ये आलदंडी जंगल परीसरातील चकमक, २०२० मध्ये येरदळमी जंगल परीसरातील चकमक, २०२१ मध्ये काकुर माड एरिया (छत्तीसगड) जंगल परीसरातील चकमक,२०२३ मध्ये हिक्केर जंगल परीसरातील चकमकीचा सहभाग आहे. २०२१ मध्ये मौजा कोठी, २०२३ मध्ये मिळदापल्ली व २०२४ मध्ये ताडगाव अशा तीन ठिकाणी झालेल्या निरपराध नागरिकांच्या खून प्रकरणांतही तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. याशिवा २०२२ मध्ये कापेवंचा राजाराम (खांदला) येथे दरोड्यामध्येसुद्धा प्रत्यक्ष सहभाग होता. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता केंद्र व राज्य शासनाकडून तिला एकूण ४.५ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर झाले आहे. विशेष म्हणजे २०२२ ते आतापर्यंत एकूण ३१ जहाल माओवाद्यांनीआत्मसमर्पण केले आहे. या महिला माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्य प्रवाहात आणण्याबाबतची कारवाई विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदिप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल,, पोलिस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफच्या ९ क्रमांक बटालियनचे कमांडन्ट शंभू कुमार, उप कमाडंन्ट सुमीत वर्मा यांच्या मार्गदर्शनात पार पडली. यावेळी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर पोलिस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सर्वतोपरी मदत करेल. तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्विकारावा, असेही म्हटले आहे.

————————————