जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

335

गडचिरोली, ता. १२: ‘आदमी मरता है, आत्मा नहीं, असा व्हॉटस अॅपवर स्टेटस ठेवून जिल्हाधिका-यांच्या शासकीय निवासस्थानी तैनात राज्य राखीव दलाच्या सुरक्षा रक्षकाने कानशिलात गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली.

 

उत्तम किसनराव श्रीरामे (३२), असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव असून, ते नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील रहिवासी होते. ते विवाहित होते. राज्य राखीव दलाच्या पुणे येथील गट क्रमांक १ मध्ये कार्यरत असलेले उत्तम श्रीरामे हे जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या ‘शिखरदीप’ या शासकीय निवासस्थानी सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होते. आज सकाळी ८ वाजतापासून १० वाजतापर्यंत कर्तव्य बजावल्यानंतर ते जिल्हाधिकाऱ्या निवासस्थानाच्या आवारातब असलेल्या विश्रामगृहात गेले. तेथे खाटेवर झोपून त्यांनी आपल्या डाव्या कानशिलात गोळी घातली. ती गोळी उजव्या कानशिलातून बाहेर निघाली, गोळीबाराचा आवाज येताच बंगल्यावर तैनात इतर सुरक्षा रक्षक धावत गेले. तेव्हा उत्तम श्रीरामे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनेच्या काही वेळापूर्वीच जिल्हाधिकारी संजय मीणा हे बाहेर गावाहून येऊन आपल्या निवासस्थानी पोहचले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला, आत्महत्या करण्यापूर्वी श्रीरामे यांनी ‘आदमी मरता है, आत्मा नहीं… असा स्टेटस व्हॉटस अॅपवर ठेवला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. श्रीरामे यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, हे पोलिस तपासात स्पष्ट होणार आहे.

—————————