ग्लोबल गडचिरोली न्यूज पोर्टलचे थाटात उद्घाटन

405

ग्लोबल गडचिरोली न्यूज पोर्टलचे थाटात उद्घाटन

गडचिरोली, ता. १४ – अतिदुर्गम, आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सर्व घडामोडी जनतेपर्यंत पोहोचविण्यासह विविध प्रकारच्या संस्कृती व जगभरातील उपयोगी माहिती देण्यासाठी ग्लोबल गडचिरोली न्यूज पोर्टल सुरू करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीच्या शुभपर्वावर या न्यूज पोर्टलचे उद्घाटन डाॅ. अनंता कुंभारे यांच्या हस्ते करण्यात आले.
पत्रकारीतेच्या क्षेत्रात नवी क्रांती घडवण्यास सज्ज झालेल्या या न्यूज पोर्टलच्या मुख्य संचालिका व संपादक तिलोत्तमा हाजरा आहेत. या कार्यक्रमाला रामायण खटी, नंदकिशोर काथवटे, प्रमोद पळशीकर, गोविंद नंदपुरकर, नयन कहाले, समर हाजरा, सागर हाजरा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्या उद्घाटनपर मनोगतात डाॅ. कुंभारे म्हणाले की, गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात अशा प्रकारच्या न्यूज पोर्टलची नितांत आवश्यकता होती. वसंत पंचमीच्या शुभपर्वावर प्रारंभ झालेले हे न्यूज पोर्टल अल्पावधितच जनतेच्या मनात मानाचे स्थान मिळवेल, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. यावेळी इतर मान्यवरांनीही पत्रकारीतेच्या क्षेत्रात खंबीरपणे पाय रोवणार्या तिलोत्तमा हाजरा यांचे कौतुक करत न्यूज पोर्टलच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात तिलोत्तमा हाजरा यांनी या नव्या कोर्या न्यूज पोर्टलची माहिती देताना त्यातील नाविन्य व विशेषता सांगितली. अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे हे न्यूज पोर्टल मराठीसह हिंदी, बांग्ला, इंग्रजी व गोंडी भाषेतही राहणार आहे. त्यामुळे येथील माहितीचा लाभ विविध भाषांतील नागरिकांना घेता येणार आहे. या माध्यमातून आपण भाषिक एकात्मता साधणार असून सकारात्मक पत्रकारीतेवर भर देणार असल्याचे तिलोत्तमा हाजरा यांनी आपल्या मनोगतात सांगितले.