शिवाजी महाराजांच्या लोक हितकारी कार्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे

333

गडचिरोली,ता. २३ :

छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत ज्यांचे ३५० वे स्वराज्यभिषेकाचे वर्ष साजरे होत आहे. ते अन्यायाचे , अत्याचाराचे विरोधक होते. संपूर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचे स्थान आहे.त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. ते लोकहिताचे मूल्य जपणारे राजे होते, असे प्रतिपादन महाराजा ऑफ नागपूर श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांनी केले.गोंडवाना विद्यापीठात शुक्रवार (ता. २३) छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन पार पडले.यावेळी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विशेष म्हणजे श्रीमंत राजे मुधोजी भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे होते. प्रमुख वक्ते म्हणून पुण्याच्या राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रशांत मोहिते, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. विकास चित्ते आदी उपस्थित होते. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख वक्ते राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचा विद्यार्थ्यांनी संशोधनासाठी, महाराजांचे कार्य जाणून घेण्यासाठी तसेच स्वतःची बौद्धिक क्षमता वाढवून करायला हवा. समारोपीय भाषणात प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे म्हणाले की, शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्यांच्या अंगी असलेले कौशल्य, सर्वधर्मसमभाव, समानता, स्वातंत्र्य, बंधुता, माणुसकी ही मूल्ये त्यांनी रुजविली. या अध्यासन केंद्रामार्फत विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे विचार रुजावे आणि येणाऱ्या प्रत्येक पिढीपर्यंत ते कसे पोहचवता येईल हाच आमचा प्रयत्न आहे. जनसंवाद विभागाचे स. प्रा. संजय डाफ यांनी श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांचा परिचय करून दिला. वक्ते प्रा. नामदेव जाधव यांचा परिचय मराठीचे सहायक प्रा. अमोल चव्हाण यांनी करून दिला. गोंडवाना विद्यापीठात शिवाजी महाराज अध्यासन केंद्र व्हावे, यासाठी माजी सिनेट सदस्य संध्या येलेकर यांनी प्रस्ताव ठेवला होता. त्यासाठी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे, मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.चंद्रमौली, वित्त व लेखाधिकारी भास्कर पठारे, सिनेट सदस्य स्वरूप तारगे, सतीश पडोळे, माजी सिनेट सदस्य संध्या येलेकर तसेच शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. विकास चित्ते, संचालन रसायनशास्त्र विभागाचे सहायक प्रा. प्रशांत ठाकरे यांनी केले, तर आभार कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.