Home Gadchiroli अवघ्या सात वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणारा नराधम जेरबंद

अवघ्या सात वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणारा नराधम जेरबंद

118

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ९ : घराच्या रंगकामासाठी आलेल्या एका नराधमाने एकांताचा फायदा घेत घरात खेळणाऱ्या सात वर्षीय निरागस बालिकेवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रज्वल उर्फ नारू सदाशिव भांडेकर (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या नराधमाच्या विकृत कृत्यामुळे समाजमन सुन्न झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, पीडित बालिकेच्या राहत्या घरात सध्या रंगकामाचे काम सुरू आहे. नेहमीप्रमाणे ही बालिका घराच्या गच्चीवर खेळत होती. यावेळी तिथे रंगकाम करत असलेल्या प्रज्वल भांडेकरने आजूबाजूला कोणीही नसल्याची संधी साधत तिला एकांतात गाठून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. भितीपोटी बालिका विरोध करण्यास असहाय्य होती. मात्र घटनेनंतर पीडित बालिकेला शारीरिक त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांच्या मनात संशय आला. त्यांनी तत्काळ तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले. वैद्यकीय अहवालात बालिकेवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट होताच कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला. यानंतर पीडितेच्या आईने चामोर्शी पोलिस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवताच चामोर्शी पोलिसांनी तत्काळ आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील नवीन कलमांनुसार (कलम ६४(१), ६५(२) आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पोक्सो कायदा, २०१२) मधील कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पढील तपास पोलिस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले करत आहेत.

———————————————